Wardha : मलातपुर शेतशिवारात हजारो कोंबड्यांचा खच, तब्बल 1 हजार 340 कोंबड्यांच्या मृत्यू
अचानक कोंबड्या दगवल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उष्माघातामुळे या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वर्धा : देवळी तालुक्यात अचानक मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालनातील हजारोंच्या संख्येने कोंबड्यांचा खच दिसून आल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले. या घटनेनंतर त्या शेतकऱ्याला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. उष्माघातामुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. कुकूटपालन म्हटलं की कोंबड्यांची काळजीही तेवढीच घ्यावी लागते. विशेषतः उन्हाळ्यामध्ये उन्हापासून रक्षण करण्यासाठी काळजी, पाणी आणि इतर गोष्टींची दक्षता कुक्कुटपालन करणारे शेतकरी घेतात.
मात्र देवळी तालुक्यातील मलातपूर शेत शिवारात असलेल्या विजयगोपाल येथील युवा शेतकरी सागर पजगाडे यांच्या कुकूटपालनातील अचानक तब्बल 1 हजार 340 कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या आहेत. त्यामुळे त्यांचे जवळपास चार लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज
मलातपुर गावाजवळ सागर पजगाडे यांचे आठ हजार पक्ष्यांचे कुक्कुटपालनाचे शेड आहे. आज सायंकाळच्या सुमारास त्यांना अनेक पक्षी मृत अवस्थेत आढळल्याने त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत सांगितले. तसेच पुलगाव पोलीस स्टेशन ला देखील माहिती दिली. सध्या नवतपा सुरू असून प्रचंड उष्णतेने नागरिक हैराण झाले असताना या मुक्या जनावरांना ही उष्णता सोसली नसावी. गेल्या आठवड्याभरापासून वाढलेल्या उष्णतेचा हा परिणाम असावा. उष्माघाताने या कोंबड्यांच्या मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून 1 जून रोजी दहा वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत वीज वितरण विभागाने वीजपुरवठा खंडित केल्यामुळे हा अनर्थ घडला असल्याचे शेतकऱ्याने सांगितले आहे.
मृतावस्थेत आढळलेल्या कोंबड्यांचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने शवविच्छेदन केले आहे. परंतु अचानक मोठे नुकसान झाल्याने शेतकरी सागर पजगाडे हे पुरते हवालदिल झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- वर्षभरात भाज्यांचे भाव दुप्पट! एका किलोच्या किंमतीत आता पाव किलोच भाजी
- ऊसाचे बिल मागणाऱ्या शेतकऱ्याला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण
- Soybean : खरिपाच्या तोंडावर बियाण्यांचा अभूतपूर्व तुटवडा; राज्यमंत्री बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर