Shetkari Sanghatana : साखर आयुक्त ठराविक मंत्र्यांच्या सांगण्यावरून काम करतात, शेतकरी संघटनेच्या पांडुरंग रायतेंचा आरोप
साखर आयुक्त शेखर गायकवाड हे ठराविक मंत्र्यांच्या सांगण्यावरुन काम करतात. तसेच त्यांच्या कामाची पध्दत चुकीची असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पांडुरंग रायतेंनी केला आहे.
Shetkari Sanghatana : यंदाचा ऊस गळीत हंगाम हा येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. मात्र, त्यापूर्वी शेतकरी संघटनेचे (Shetkari Sanghatana) पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पांडुरंग रायते (Pandurang Rayate) यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) यांच्यावर आरोप केला आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड हे ठराविक मंत्र्यांच्या सांगण्यावरुन काम करतात. तसेच त्यांच्या कामाची पध्दत चुकीची असल्याचा आरोप रायतेंनी केला आहे. 1 ऑक्टोबर रोजी राज्यातील गळीत हंगाम सुरू करणार असे साखर आयुक्तांनी सांगितले होतं. परंतू, आता 15 ऑक्टोबरच्या आधी कारखाने सुरु करायचे नाहीत असं परिपत्रक साखर आयुक्तांनी काढल आहे.
FRP न देणाऱ्या कारखान्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा
जे साखर कारखाने 15 ऑक्टोबरच्या आधी सुरु करतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होणार असल्याचे साखर आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे. मागचा गळीत हंगाम संपला तरी अद्यापही शेतकऱ्यांना त्यांचे एफआरपीचे (FRP) पैसे मिळाले नाहीत. त्यामुळं त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करायला पाहिजे होते असं पांडुरंग रायते यांनी म्हटलं होतं. मात्र, त्यांच्यावर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कोणतीही कारवाई केली नाही. राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. मागच्या हंगामात अनेक शेतकऱ्यांचे ऊस कारखान्याला गेले नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागले होते असेही रायते म्हणाले.
ऊस गाळपाची तारीख बदलून साखर आयुक्तांनी शेतकऱ्यांची निराशा केली
यंदाच्या वर्षी साखर कारखाने 1 ऑक्टोबर रोजी सुरु करणार असं साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं होते. मग आता नवीन परिपत्रक का काढले? या मागचे गौडबंगाल काय आहे? असा सवाल देखील पांडुरंग रायते यांनी विचारला आहे. त्यामुळं साखर आयुक्त शेखर गायकवाड हे मंत्र्यांच्या सांगण्यावरुन काम करतात. तसेच नियमाच्या चौकटीत काम करत नाहीत असा आरोप पांडुरंग रायते यांनी केला आहे. साखर कारखाने सुरु करण्याची तारीख बदलण्यामागचे नेमकं कारण काय ते आयुक्तांनी जाहीर करायला हवं. मागील वर्षी गाळप हंगाम व्यवस्थित पार पडला नाही. त्यामुळं काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता साखर आयुक्तांनी ऊस गाळपाची तारीख बदलून शेतकऱ्यांची निराशा केली असल्याचे रायते यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: