Swabhimani Shetkari Sanghatana : शेतीसाठी दिवसा वीज देण्याच्या मागणीवरुन स्वाभिमानी आक्रमक, उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार
शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, हा मुद्दा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं चांगलाच लावून धरला आहे. दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
Swabhimani Shetkari Sanghatana : सध्या विविध शेती प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, हा मुद्दा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं चांगलाच लावून धरला आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. शेतकऱ्यांना रात्री वीज देणं हे मानवी हक्काचं उल्लघंन असल्याचे स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना सध्या रात्रीच्या वेळेस वीज देण्यात येत आहे. ही वीज दिवसा मिळावी अशी वारंवार शेट्टी यांनी मागणी केली आहे. या मुद्यावरुन राजू शेट्टी यांनी आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. दरम्यान, राज्यात वीजेची वाढती मागणी आणि कोळशाचा तुटवडा यामुळे संपूर्ण राज्यात भारनियमन सुरु आहे. त्याचे वेळापत्रक देखील राज्य सरकारने जारी केले आहे. या भारनियमनाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. त्यांची उभी पिक करपू लागली असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना शेतीपंपास दिवसा 10 तास वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कोल्हापुरात आंदोलन केलं होतं. हे आंदोलन सुरु असताना राज्य सरकार स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यात बैठक झाली होती. यामध्ये येत्या 15 दिवसात निर्णय घेणार असल्याचे आश्वासन उर्जमंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दिलेल्या प्रस्तावावर अभ्यास करण्यासाठी उर्जामंत्री नितीन राऊत यांनी तज्ज्ञ समिती नियुक्त केली आहे. या तज्ञ समितीचे अध्यक्ष महावितरणचे वितरणचे संचालक असून 8 लोकांची समिती गठीत करण्यात आली आहे. या आंदोलनादरम्यान पंढरपूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने व्हिडिओ करुन आपला जीव गमावला होता. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता. दरम्यान, आंदोलनाची तीव्रता पाहता उर्जामंत्र्यांनी राजू शेट्टींसोबत मुंबईला बैठक घेतली. या बैठकित लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिले होते. यानुसार तातडीने हालचाली करून 8 सदस्यांची समिती नेमली आहे. ही समिती अभ्यास करून दिवसा 10 तास विजपुरवठा करण्याबाबतचा अहवाल शासनास देईल असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला होता. मात्र अद्याप यावर सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. दिवसा वीज देण्याबाबत तोडगा काढू, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले होते. मात्र, अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे स्वाभिमानी आक्रमक झाली आहे. त्यामुळं आता उच्च न्यायालयता याचिका दाखल करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: