(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Heat Wave: देशात उन्हाचा चटका; तापमानात 6 ते 8 अंश सेल्सिअसची वाढ, रब्बी पिकांच्या उत्पादनावर परिणाम
राजधानी दिल्लीसह अनेक भागात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. तापमानत 6 ते 8 अंशाची वाढ झाली आहे.
Heat Wave : देशात सध्या उष्णतेची लाट आली आहे. राजधानी दिल्लीसह अनेक भागात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. उष्णतेची लाट ही सहसा एप्रिल-मे महिन्याच्या सुरुवातीला येते. परंतू यावेळी ती मार्चमध्येच देशाच्या अनेक भागांमध्ये सुरु झाली आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून तापमानात अचानक 6 ते 8 अंश सेल्सिअसने वाढ झाल्यानं उन्हाच्या झळा लागू लागल्या आहेत. हे उच्च तापमान आणखी दोन आठवडे कायम राहिल्यास पंजाब, हरियाणा, राजस्थानचा काही भाग आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील रब्बी पिकांच्या उत्पादनावर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, तीव्र उष्णतेमुळं गडगडाटासह वादळे, गारपीट किंवा धुळीचे वादळ यासारख्या तीव्र मान्सूनपूर्व क्रियाकलाप होऊ शकतात. यामुळं कापणीसाठी तयार असलेल्या पिकांचंही मोठं नुकसान होऊ शकते. येत्या 24 ते 48 तासात तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता असून, त्यामुळं देशातील अनेक भागांतून उष्णतेची लाट कमी होण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
आज देशातील हवामानाचा अंदाज
अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस तसेच काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अंदमान समुद्रावर वाऱ्याचा वेग 60 ते 70 किमी प्रतितास पोहोचल्याने समुद्राची स्थिती उग्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे, केरळ आणि दक्षिण कर्नाटकात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तामिळनाडूमध्ये हलका पाऊस तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश तसेच हिमाचल प्रदेश आणि पूर्व आसाममध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालयात हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फ पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे दिल्लीत पारा चढला होता
गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेमुळं उष्णतेमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळं दिल्लीसह देशाच्या अनेक भागांमध्ये त्याचा प्रभाव दिसून येत आहे. दिल्लीचे तापमान 34 ते 36 अंशांवर पोहोचले आहे.
मध्य प्रदेशात कडक ऊन
मध्य प्रदेशात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारनंतर सगळीकडे सामसूम होत असल्याचे दिसून येत आहे. उष्णतेची स्थिती पाहून लोक कूलर आणि मॅट खरेदी करण्यात व्यस्त झाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून भोपाळचे तापमान 38 अंशांच्या वर गेले आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्येही उष्णता वाढली आहे. तेथील तापमान 40 अंशांच्या आसपास पोहोचले आहे. मध्य प्रदेशातील होशंगाबादच्या नर्मदापुरममध्ये उष्णतेमुळं गेल्या 10 वर्षांचा विक्रम मोडला असून, तिथे तापमान 42 अंशांच्या पुढे जात आहे.
राजस्थान
राजस्थानमधील जैसलमेरमध्ये उष्णता वाढली आहे. उष्णतेच्या लाटेमुळं तापमान 42 अंश सेल्सिअस झाले आहे. जे स्थानिकांसह पर्यटकांसाठीही अडचणीचे ठरले आहे. जर आपण पश्चिम राजस्थान म्हणजेच जोधपूरबद्दल बोललो तर तेथील तापमान आधीच 46 अंश सेल्सिअस आहे. उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून लोकांनी घर आणि कार्यालयात एसी आणि कुलर सुरु केले आहेत.