(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palghar News : हंगामाच्या सुरुवातीलाच आंबा,काजू, जांबु फळांवर अवकाळी आणि गारपिटीच संकट!
Palghar News : हंगामाच्या प्रारंभी आंबा,काजू, जांबु फळांवर अवकाळी आणि गारपिटीच संकट गडद असून अवकाळी पावसामुळे फळ उत्पादक बागायतदारांना नुकसानीची भीती आहे.
Palghar News : पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा वाडा डहाणू या तालुक्यातील काही भागांत गुरुवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या अवकाळी तुरळक पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी बागायतदार पुन्हा एकदा संकटांत सापडला आहे. हंगामाच्या प्रारंभी आंबा, काजू, जांबू पिकांची फळगळती होऊन आर्थिक नुकसानीची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान उपाययोजना अंमलात आणण्याचं मार्गदर्शन कृषीतज्ञांनी शेतकऱ्यांना केलं आहे. लॉकडाऊन काळात या फळांची निर्यात खंडीत झाल्यानं उत्पादकांचं मोठं नुकसान होऊन हंगाम वाया गेले होते. मात्र यंदा या झाडांना चांगला बहर आला आहे. त्यातच अवकाळीमुळे मोठं अस्मानी संकट ओढवलं आहे.
डिसेंबर महिन्यापासून जांबु फळांच्या हंगामाला प्रारंभ होऊन जूनपर्यंत तीन ते चार वेळा फुलोरा येऊन उत्पादन घेता येतं. गतवर्षी जानेवारी महिन्यात सफेद, हिरवे, फिके आणि गडद लाल तसेच गडद गुलाबी रंगातील ही फळं बाजारात येण्यास सुरुवात झाली आहेत. या टप्प्यात फळांची संख्या कमी असली, तरी प्रतिनग किंवा शेकड्यांनी विकल्या जाणाऱ्या या फळांना चांगला भाव असल्याची माहिती बागायतदारांनी दिली. मुंबईसह शहरातील नागरिकांचे हे पसंतीचे फळ असून हॉटेल व्यावसायिकांकडून सॅलेडसाठी लाल, हिरव्या जांबूला मोठी मागणी आहे.
दरम्यान, अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्यानं विषम वातावरण आणि फळमाशीच्या प्रादुर्भावानं फळगळतीचा धोका वाढला आहे. त्यामुळे योग्य व्यवस्थापन करून उपाययोजना अंमलात आणण्याच्या सूचना कृषी तज्ञांनी केल्या आहेत. मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणात उत्पादन येऊनही लॉकडाऊनमुळे बाजारात या फळांची मागणी रोडावल्यानं बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला होता. यंदा पुन्हा जानेवारी महिन्यात संसर्ग वाढल्यानं लॉकडाऊन लागल्यास नुकसानीची भीती उत्पादकांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मासिक दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं आंबा आणि काजू या झाडांना आलेला मोहर गळायला सुरुवात झाली आहे. तर जव्हार मोखाडा विक्रमगड भागांत मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेतलं जातं. नवीन लागवड झालेल्या बागायतीमध्ये पाणी साचल्यानं आणि गारपीट झाल्यानं शेडनेट तसेच रोपांचंही मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा अस्मानी संकटात सापडला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Maharashtra Agricultural Budget 2021 : पीक विमा योजनेबाबत ठोस निर्णय नाही, अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची निराशा : अजित नवले
- Maharashtra Budget 2022 : कृषी क्षेत्रासाठीच्या तरतुदी योग्य दिशेनं, अंमलबजावणी झाल्यास शेतकर्यांना लाभ : अनिल घनवट
- Maharashtra Budget 2022 : सोयाबीन आणि कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी एक हजार कोटींचा निधी, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha