(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनं दीड लाख हेक्टरवरील सोयाबीन पाण्यात, कर्ज काढून रब्बीची पेरणी करण्याची वेळ
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरवरील सोयाबीन पाण्यात गेलं आहे.
Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाचा (Rain) मोठा फटका शेतकऱ्यांना (Farmers) बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरवरील सोयाबीन पाण्यात गेलं आहे. शेतकऱ्यांची दिवाळी पाण्यात गेली आहे. गोडधोड तर दूरच पण खण्याचेही वांदे झाले आहेत. सावकारी कर्ज काढून रब्बीची (Rabi) पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाच्या फटक्यानं यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी अक्षरशः पाण्यात गेली आहे. राज्यभरातील नोकरवर्ग, व्यापारी, नेते यांनी नवीन कपडे, फटाके गोडधोड खाऊन उत्साहात दिवाळी साजरी केली. मात्र जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी मात्र,अतिवृष्टी आणि परतीच्या पावसानं दिवाळ सणाचे कपडे, गोडधोड तर दूरच पण आता खाण्या पिण्याचेही वांदे होऊन बसलेत. दरम्यान नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने दीड लाख हेक्टर पेक्षा जास्त सोयाबीन वाया गेलं आहे. त्यामुळं अतिवृष्टीच्या तडाख्यानं पिकांसह शेतकरी देखील उद्धस्त झाला आहे. तर अतिवृष्टीचे अनुदान, पीक विमा न मिळाल्यानं शेतकऱ्यांना सावकारी कर्ज काढून रब्बीची पेरणी करण्याची वेळ आली आहे.
यावर्षी नांदेड जिल्ह्यात 1 हजार 350 ते 1 हजार 400 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस
नांदेड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 850 मिलिमीटर पावसाची नोंद होते. दरम्यान यावर्षी 1 हजार 350 ते 1 हजार 400 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जो दरवर्षीच्या तुलनेत 400 मिलिमीटरपेक्षा जास्त आहे. सुरुवातीला अवकाळी पावसानंतर अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाच्या जोरदार तडाख्यानं यावर्षी सोयाबीन, उडीद, मूग, कापूस या पिकांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांचा पोळा गोड करु असे आश्वासन दिले होते. परंतू, पोळा गेला, दसरा गेला आणि आता दिवाळीही गेली आहे. मात्र, शेतकऱ्यांना अध्यापही मदत मिळाली नाही. पीक विमा मिळाला नाही, काही शेतकऱ्यांना मदत मिळाली पण ती देखील अत्यल्प आहे.
सरकारनं लवकरात लवकर मदत द्यावी
दरम्यान, रब्बी हंगामाला सुरुवात झाली असताना, रब्बीची पेरणी कशी करावी, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढं आहे. अतिवृष्टी व परतीच्या पावसाने हाता तोंडाशी आलेली पिके पाण्यात गेली आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या दिवाळी सणावर संक्रात आली होती. खरीप हंगामात काहीच शिल्लक राहिले नसल्याने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावकारी कर्ज काढून रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी पेरणीला सुरूवात केली आहे. दरम्यान आता तरी पिक विमा,अतिवृष्टीचे अनुदान सरकारने लवकरात लवकर द्यावे यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: