Raju Shetti : सरकारविरोधात स्वाभिमानी आक्रमक, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज राजू शेट्टींच्या नेतृत्वात मोर्चा
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
Raju Shetti : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात पाच दे दहा हजार शेतकरी सहभागी होणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितेल आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारही शेतकऱ्यांच्या हिताविरोधात काम करत आहे. त्याच्या निषेधार्थ विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच रत्नागिरी-सोलापूर रस्ता भुसंपादन बेकायदेशीर आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर उठणाऱ्याला ऊसाचा बुडका घेवून वटणीवर आणू असा सज्जड दम शेट्टी यांनी भरलाय. याचबरोबर साखरेचे दर वाढल्याने उसाचा दुसरा हप्ता दोनशे रुपये द्यावा अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. खते आणि पशुखाद्य यांची दरवढ तत्काळ मागे घ्यावी, सक्तीचे वीज कनेक्शन तोडणे बंद करावे, भुमिग्रहण, अधिग्रहण कायदा पूर्वीप्रमाणे लागू करावा, कर्जाची नियमीत परकफेड करणाऱ्या सेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान मिळावे या मागण्यांसाठी शेट्टी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
दरम्यान, या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आधीच वातावरण निर्मिती केली आहे. जिल्ह्यात सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांनी दौरे करुन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. त्यामुळे या मोर्चात मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थिती दर्शवण्याची शक्यता आहे. आज दुपारी 12 वाजता दसरा चौकातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या मोर्चाला सुरूवात होणार आहे.
राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात आता दंड थोपटले आहेत. महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी राजू शेट्टी हे सक्रिय होते. इतकंच नाही तर ते महाविकास आघाडीचे सूचकही होते. मात्र, मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार आणि राजू शेट्टी यांच्यात बिनसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण, भूमी अधिग्रहण कायदा, ऊस दराचा मुद्दा, वीज वसुली आदी विषयांवरुन राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. आता शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार नसतील तर गप्प बसून चालणार नाही, असा इशाराच शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: