Maharashtra Weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं थैमान! बीडमध्ये 500 कोंबड्यांचा मृत्यू, विदर्भासह मराठवाड्याला झोडपलं
Unseasonal Rain News : विदर्भासह मराठवाड्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी आंबा, पपई बागांचं नुकसान झालं आहे.
मुंबई : महाराष्ट्रावर (Maharashtra Weather Update) अवकाळी पावसाचं संकट (Unseasonal Rain) कायम आहे. राज्यात गेल्या आठवड्याभरात विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला आहे. विदर्भासह (Vidarbh) मराठवाड्यात (Marathwada) सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी आंबा (Mango), पपई (Papaya) बागांचं नुकसान झालं आहे. बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाचं संकट ओढवलं आहे. आष्टी तालुक्याला सर्वाधिक फटका बसला असून 500 कोंबड्या मरण पावल्या आहेत. अनेक घरांचे छप्पर उडून गेलं आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
500 कोंबड्यांच्या मृत्यू
बीड जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी शेतकऱ्यांना या पावसाचा सामना करावा लागतोय. आधीच अडचणीत असणारे शेतकरी आता अवकाळीच्या संकटाला सामोरे जात आहेत. आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने फळबागेसह पशुधन मृत्युमुखी पडले आहेत. सांगवी पाटण या ठिकाणी शेख दगडू यांच्या पोल्ट्री फार्ममधील 500 कोंबड्या मरण पावल्या आहेत. प्रशासनाने या नुकसानग्रस्त परिस्थितीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जाते.
केळी आणि आंब्याच्या फळबागांचं मोठं नुकसान
बीडमधील धारूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे केळी आणि आंब्याच्या फळबागाचं प्रचंड नुकसान झालं असून व्यथा मांडताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे धारूर तालुक्यातील कांदेवाडी येथे मोठ्या प्रमाणात केळी आणि आंब्याच्या फळबागांचं प्रचंड नुकसान झालं आहे, तर बारा एकरावर लावलेल्या केळीच्या बागा वादळी वारा आणि पावसामुळे जमिनदोस्त झाल्या आहेत. रात्रीच्या वेळी अचानक धारूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी बँकेचे आणि खाजगी सावकाराचं कर्ज काढून या बागा जोपासल्या होत्या आणि आता ऐन फळ तोडणीच्या काळामध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे बँकेचे कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर, नुकसानीची व्यथा मांडताना काही शेतकऱ्यांना अश्रू रानावर झाले.
अवकाळीनं शेतातील पीक भुईसपाट
मागील दोन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं अक्षरशः थैमान घातलं. मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकळी पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळं शेतातील उभा मका, भातपीक अक्षरशः जमीनदोस्त झाले आहेत. तर, आंब्याचं मोठं नुकसान झालं आहे. यासोबतच बागायती पिकांचाही नुकसान झालं आहे. अनेकांच्या घरावरील छत उडाल्यानं घरातील जीवनोपयोगी साहित्याची नासाडी झाली आहे. कापणीला आलेले भातपीक आणि मका पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे.
वांगे, कारली, काकडी पिकालाही अवकाळी पावसाचा फटका
गोंदिया जिल्ह्यामध्ये रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने आंबा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गोंदिया जिल्ह्यातील हौसीटोला या गावातील शेतकरी मुन्ना काठेवार यांनी आंब्याची बाग लावली आहे. काल अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने त्यांच्या बागेतील पूर्ण आंबे जमीनदोस्त झाले आहेत. तर वांगे, कारली, काकडी या पिकांना देखील प्रचंड नुकसान झाला. यात शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले असुन तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे.