Agriculture News : शेतकऱ्यांनी एचटीबीटी कापूस बियाणे खरेदी आणि लागवड करु नये; कृषी विभागाचे आवाहन
Nanded News : कृषी विभाग व पोलीस विभाग एचटीबीटी बियाणे विक्री करणाऱ्यावर लक्ष ठेवून आहेत
Nanded News : बाजारात बोगस कंपन्या, परवाना नसलेली अनाधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता आहे. अशा अनधिकृत बियाणांना काही व्यक्ती तणनाशक बीटी, आर-आरबीटी आणि बीटीबीजी-3 या नावाने संबोधतात. या अवैध बियाणांना शासनाची मान्यता नाही. शेतकऱ्यांनी अशा अनधिकृत कंपन्याच्या आमिषाला बळी पडू नये. तसेच एचटीबीटी बियाण्यांची खरेदी करु नये आणि त्या बियाणांची शेतात लागवड करु नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे. तर अवैध बियाणांची विक्री करणे, बाळगणे, साठा करणे गुन्हा आहे. या प्रकारचे अनधिकृत कापूस बियाणे लागवड केलेल्या कापूस पिकाच्या पानांचे नमुने यांची एचटीबीटी जनुके तपासणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत आहे. नमुना तपासणीअंती एचटीबीटी जनुके आढळल्यास संबंधितावर कारवाई होऊ शकते. कृषी विभाग आणि पोलीस विभाग एचटीबीटी बियाणे विक्री करणाऱ्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे हे बियाणे विक्रीचा प्रयत्न करु नये असे निर्देश कृषी विभागाच्यावतीने (Agriculture Department) देण्यात आले आहेत.
शेतकरी शेतमजूर यांचे आरोग्य धोक्यात येईल...
शासनाची मान्यता नसलेली एचटीबीटी बियाणे लागवडीनंतर ग्लायफोसेट हे तणनाशक फवारण्याची बनावट कंपनी आणि विक्रेते शिफारस करतील. अनधिकृत बियाणे विक्रीसाठी बोगस कंपन्या खाजगी एजंट, खाजगी व्यक्तींच्या आमिषास आणि प्रलोभणास शेतकऱ्यांनी बळी पडू नये. ग्लायफोसेट तणनाशक कार्सिनोजेनिक गुणधर्माचे असून त्यांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यास कॅन्सरसारखे रोग उद्भवण्याची शक्यता आहे. ग्लायफोसेट तणनाशकाच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होऊन भविष्यात त्या जमिनीत कोणतेही पीक लागवड करता येणार नाही. त्यामुळे जमीन नापीक होईल आणि सर्व शेतकरी शेतमजूर यांचे आरोग्य धोक्यात येईल. तसेच ग्लायफोसेट तणनाशकाचा पिके नसलेल्या जमिनीवर आणि चहा मळयासाठी वापर करण्याची करण्याची शिफारस केंद्र शासनाने केली आहे.
अधिकृत विक्रेत्याकडून अधिसूचित बियाणे पावतीसह खरेदी करावेत
ग्लायफोसेट हे तणनाशकाचा इतर पिकांवर वापरता येणार नाही. मान्यता नसलेल्या एचटीबीटी कापसाची लागवड रोखण्यासाठी आणि कार्सिनोजेनिक गुणधर्म असलेल्या ग्लायफोसेट अतिवापरामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत कंपनी उत्पादित व अधिकृत बियाणे विक्री परवाना धारकाकडूनच परवानगी असलेले कापूस बीटी बियाणे खरेदी करावेत. शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून अधिसूचित बियाणे पावतीसह खरेदी करावेत. अनाधिकृत बीटी बियाणे खरेदीसाठी बनावट कंपन्या, खाजगी एजंट प्रलोभण देत असतील तर याबाबतची माहिती तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग यांना देण्यात यावी, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: