संभाजीनगरमध्ये ‘सिट्रस इस्टेट’चे लोकार्पण; मोसंबीची दर्जेदार- जातिवंत रोप तयार होणार
Chhatrapati Sambhaji Nagar : या प्रकल्पाच्या माध्यमातून मोसंबीची दर्जेदार आणि जातिवंत रोप तयार करण्यात येणार आहेत.
Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील इसारवाडी येथे शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणाऱ्या ‘सिट्रस इस्टेट’ उभारण्यात येत असून, या प्रकल्पाचे आज (19 मे) रोजी लोकार्पण करण्यात आले आहे. 40 कोटी रुपये खर्चुन उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून मोसंबीची दर्जेदार आणि जातिवंत रोप तयार करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारकडून सेंटर ऑफ एक्सलन्स (Center of Excellence) अंतर्गत आणखी 12 कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याने एक जागतिक दर्जाचे ‘सिट्रस इस्टेट’ म्हणून हा प्रकल्प नावारुपास येणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातीलच नाही तर मराठवाड्यातील आणि पर्यांयाने राज्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्याची शक्यता आहे. तर ‘सिट्रस इस्टेट’ च्या विविध विकासकामांचे भुमिपूजन पालकमंत्री संदिपान भूमरे यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान यावेळी बोलताना भुमरे म्हणाले की, ‘सिट्रस इस्टेट’ उभारणीचा अभ्यास करण्यासाठी पंजाब येथील सिट्रस पार्कचा बारकाईने अभ्यास केला. तर इसारवाडीतील ‘सिट्रस इस्टेट’ मधून शेतकऱ्यांना मोसंबीचे दर्जेदार रोप तयार करुन देण्यात येईल. तसेच येथे मोसंबी या फळपिकावर संशोधन देखील करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या ‘सिट्रस इस्टेट’ मध्ये प्रशिक्षण घेऊन मोसंबी लागवडीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात 40 हजार हेक्टरवर मोसंबीची लागवड केली जाते. हेक्टरी 8 टन एवढे मोसंबीचे उत्पादन घेतल्या जाते पण हे उत्पादन वाढविणे आवश्यक असल्याचेही भुमरे म्हणाले.
‘सिट्रस इस्टेट’ मध्ये चांगले रोप बनविण्यात येतील.
तर यावेळी बोलताना कृषी आयुक्त सुनिल चव्हाण म्हणाले की, या सिट्रस इस्टेटच्या उभारणीसाठी पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे 40 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. राज्यात 65 हजार हेक्टर मोसंबी क्षेत्र आहे. मोसंबीला आता राजाश्रय मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवडीकडे वळले पाहिजे. ‘सिट्रस इस्टेट’ मध्ये चांगले रोप बनविण्यात येतील. तसेच प्रशिक्षण देण्यात येत असल्याने सर्वांनी प्रशिक्षण घ्यावे. पेप्सी, कोको कोला अशा शीतपेयांमध्ये मोसंबीचा रस टाकता येईल का याचा देखील राज्य सरकार विचार करत असल्याचे ते म्हणाले.
संत ज्ञानेश्वर उद्यान हे जागतिक दर्जाचे उद्यान बनणार
दरम्यान गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानच्या विकास कामांचा भुमिपुजन कार्यक्रम देखील संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्यानच्या विकास कामांसाठी सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून वाहनतळ,अंतर्गत रस्ते व अत्याधुनिक संगीत जलकारंजे यांच्या कामांना प्रारंभ झाला आहे. संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विविध विकास कामे प्रत्यक्षात सुरू झाल्याने सध्या रस्ते, पार्किंग, पाईपलाईन, संगीतकारंजे, ई पहील्या टप्प्यात कामे होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित कामे पूर्ण करून दिवाळीपुर्वी संत ज्ञानेश्वर उद्यान पर्यटकांसाठी नक्कीच खुले करण्यात येईल. सप्टेंबर मध्ये शहरात जागतिक पर्यटन परिषद होणार आहे. या परिषदेतील शिष्टमंडळांना धरण, उद्यान दाखविण्यात येईल असे भुमरे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
खारघर दुर्घटनेनंतरही मंत्र्याचा भर उन्हात कार्यक्रमाचा हट्ट?; सावलीसाठी नागरिकांची शोधाशोध