Turmeric : मराठवाड्यासह विदर्भातील हळद हिंगोलीत, बाजार समितीत 16 हजार कट्ट्यांची आवक
Turmeric : मोठ्या प्रमाणात हळदीची विक्री हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असल्याचं चित्र दिसत आहे. काल (24 एप्रिल) बाजार समितीत 16 हजार हळदीच्या कट्ट्यांची आवक झाली आहे.
Turmeric : राज्यात सांगलीनंतर (sangli) सर्वात जास्त हळदीची विक्री (Sale of turmeric) ही हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील संत नामदेव मार्केट यार्डमध्ये (Sant Namdev Market Yard) होत असते. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात हळदीची विक्री हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असल्याचं चित्र दिसत आहे. काल (24 एप्रिल) बाजार समितीत 16 हजार हळदीच्या कट्ट्यांची आवक झाली आहे.
बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेमुळं पाच दिवस हळद विक्री बंद राहणार
दरवर्षी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी (Farmers) हळदीची विक्री करण्यासाठी हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत येत असतात. यावर्षी देखील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात हळदीची आवक वाढली आहे. मराठवाड्यासह विदर्भातील अमरावती, यवतमाळ ,अकोला, वाशिम, जळगाव या भागातील हळद मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीसाठी दाखल झाली आहे. पुढील पाच दिवस हळद विक्री बंद राहणार आहे. बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेमुळं हळद विक्री बंद राहणार असल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळदीसाठी गर्दी केली होती.
Hingoli : हिंगोली हळदीचे मार्केट प्रसिद्ध
हिंगोली येथील हळदीचे मार्केट जिल्हाभरासह विदर्भात देखील प्रसिद्ध आहे. हिंगोली जिल्ह्यालगत वाशीम जिल्हा असल्यानं या जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी हळद विक्रीसाठी घेऊन येतात. येथील मार्केटमध्ये हळदीला दर देखील चांगला मिळतो. मागील काही दिवसापासून येथील मार्केटमध्ये हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. येथील मार्केट यार्डात लिलाव पध्दतीने हळदीची विक्री केली जाते. त्यामुळे हळद उत्पादक येथे हळद विक्रीसाठी आणतात. सध्या बाजारात हळदीचे दर स्थिर आहेत. हळदीच्या दरात फारशी तेजी-मंदी होण्याची शक्यता नसून दर टिकून राहतील, असा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. देशात हळद काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या देशातील हळदीच्या बाजारपेठेत हळदीची आवक वाढू लागली आहे.
मे अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेनं हंगाम सुरु राहणार
फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासूनच हळद विक्रीची लगबग सुरु असते. आता बाजारात हळद विक्रीची गती वाढल्याचे चित्र दिसत आहे. हळदीचा खरा हंगाम मार्च महिन्यापासून सुरू होतो. या हंगामात सर्वाधिक हळदीची आवक आणि विक्री होते. त्यामुळं मे अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेनं हंगाम सुरु राहणार असल्याची माहिती व्यापारी वर्गानं दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: