Latur News : लातूर : बाजारात कांद्यासह भाज्यांची विक्रमी आवक, वाहनांच्या लांबलचक रांगा, अनेक तासांपासून शेतकरी ताटकळले
Latur News : फक्त कांद्याची नव्हे तर भाज्यांचीदेखील विक्रमी आवक झाली. त्यामुळे बाजार परिसरात वाहनांच्या लांबलचक रांगा दिसून आल्या.
Latur News : लातूरच्या भाजी बाजारात आज कांद्याची तुफान आवक झाली. फक्त कांद्याची नव्हे तर भाज्यांचीदेखील विक्रमी आवक झाली. त्यामुळे बाजार परिसरात वाहनांच्या लांबलचक रांगा दिसून आल्या. मंगळवारी (9 जानेवारी) दुपारपासून शेतकरी वाहन चालक चांगलेच ताटकळले होते. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलिसांचा बळाचा वापर लागला. तर, पार्किंगच्या धोरणामुळे बसलेल्या आर्थिक दंडामुळे वाहन चालक आणि शेतकरी संतप्त झाले.
लातूर येथील महात्मा फुले भाजीपाला बाजारामध्ये आज कांदा, बटाटा, वांगी यासह मिरच्यांची तुफान आवक झाली. आज मंगळवारी, दुपारपासूनच भाजी बाजाराकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. लातूर जिल्ह्याला लागून असलेल्या कर्नाटकातील भाग धाराशिव जिल्हा आणि त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू होती. आज कांद्याचा लिलाव होता. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लातूर बाजाराकडे आपला माल घेऊन येणे पसंत केलं होतं. या सर्व कारणांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा निर्माण झाल्या. त्यामुळे वाहतूक नियंत्रण करणे अत्यंत जिकरीचे आणि अवघड होऊन बसलं होतं.
वेळ अमावस्येमुळे भाज्यांची आवक वाढली?
गुरुवारी 11 जानेवारी रोजी वेळ अमावस्येचा सण आहे. या सणासाठी तयार करण्यात येणारी भजी नावाच्या खाद्य प्रकारात मोसमातील सर्व भाज्या एकत्रित करून खाद्यपदार्थ तयार केला जातो. यासाठी सर्व प्रकारच्या भाजीपाला मार्केटमध्ये येण्याच्या प्रमाणात अचानक वाढ झाली. याचा थेट परिणाम भाजी मार्केटच्या यंत्रणेवर दिसून आला. कमी जागेमध्ये भरणाऱ्या भाजी मार्केटमध्ये अचानक चौपट वाहन आली आणि यंत्रणा ठपप झाल्या सारखं स्थिती निर्माण झाली. धाराशिव, परभणी, बीड त्याचबरोबर कर्नाटकातील कमल नगर उदगीर यासारख्या भागातून मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि कांदा उत्पादक शेतकरी लातूर शहरात आले होते. याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्या कारणाने पोलिसांनी बळाचा वापर केला. वाहनधारकांना आर्थिक दंड केला. यामुळे अगोदरच भाजीपालाच्या पडलेल्या दरामुळे नाराज असलेला शेतकरी आणखीन नाडला गेला आहे.