Ajit Pawar: देशी गाय संशोधन केंद्राच्या माध्यमातून गोवंश संवर्धनाचं काम व्हावं : अजित पवार
शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने गोवंश-2022 प्रदर्शन भरवण्यात आले आहे. याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.

Ajit Pawar : भारतीय समाज व्यवस्थेत गोवंशाला अन्यन्यसाधरण महत्व आहे. शेतकरी कुटुंबात समृद्धी आणण्याचे काम गोवंशाने केले आहे. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून देशी जातीच्या गोवंश संवर्धनाचे काम व्हावं, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने गोवंश-2022 प्रदर्शनाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
27 ते 29 मे या कालावधीत गोवंश-2022 प्रदर्शन आयोजित केले आहे. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल असेही यावेळी पवार म्हणाले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची देशात वेगळी ओळख आहे. या केंद्राच्या माध्यमातून देशी गोवंशाच्या संवर्धनाचे चांगले कार्य सुरु आहे. राज्यातील विभागनिहाय वेगळे वातावरण आहे. यामध्ये कोणत्या विभागात कोणत्या गाईचे पालन करावे, याबाबत या केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शनाचे चांगले काम झाले आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून प्रत्येक विभागात गोवंश प्रदर्शनाचे आयोजन करावं, अशी सूचना देखील पवार यांनी केली.
गोवंश जपून शेतकरी समृद्ध करण्यासाठी शासनाचे सहकार्य
आपल्या संस्कृतीत देशी गाईला अन्यन्यसाधारण महत्व आहे. देशी गायींचे गोमुत्र, शेण, सेंद्रीय खत, तुप, दूध, खवा यांनाही वेगळे महत्व आहे. आरोग्याच्या दृष्टीने देशी गायींच्या दुधापासून तयार केलेले पदार्थ लाभदायक आहेत. शेतकरी कुटुंबात समृद्धी आणण्याचे काम गोवंशाने केले आहे. त्यामुळे ही संस्कृती जपण्यासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
नवीन संशोधनाबाबत माहिती मिळणार
दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच दुधाचे पॅकींग आणि मार्केटींगही तेवढेच महत्त्वाचे आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन होत. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राचे काम पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी या केंद्राला भेट द्यावी. देशी गोवंश प्रदर्शनाच्या माध्यमातून देशी गोवंशाबाबत चांगल्या जाती, त्यांचे वैशिष्ट तसेच नवीन संशोधन याबाबत माहिती मिळणार आहे. शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनाचा लाभ घेत देशी गोवंश संवर्धनासाठी पुढे यावं, असेही पवार म्हणाले.
गोधनाची माहिती देणारे प्रदर्शन
गोवंश व गोपालन अशी दोन्ही बाबींची प्रयोगशील शास्त्रोक्त माहिती देणाऱ्या या प्रदर्शनात साहिवाल, थारपारकर, रेड सिंधी, राठी, गीर या अस्सल देशी दुधाळ गोवंशाबरोबरच खिलार, देवणी, लाल कंधारी, डांगी, गवळाऊ, कोकण कपिला असे महाराष्ट्रीयन गोवंश आहेत. पशुपालनातील नवीन तंत्र, दुध प्रक्रिया उद्योग,पशुखाद्य निर्मिती,चारा पिके, विविध अवजारांची माहिती या गोधन प्रदर्शनात मिळणार आहे.
व्यवस्थापनाची शास्त्रीय माहिती
देशी गाईंचे संगोपन, व्यवस्थापनाची शास्त्रीय माहिती आणि प्रात्यक्षिके, पशुखाद्य निर्मिती तंत्र आणि यंत्राचे प्रात्यक्षिक, दूध तसेच दुग्धजन्य पदार्थ निर्मिती यंत्रणा तसेच विक्री तंत्राची माहिती येथे देण्यात आली आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून हंगामी, बहुवार्षिक चारा लागवड प्रक्षेत्र भेट, मूरघास निर्मिती तंत्र आणि यंत्रांचे प्रात्यक्षिक, शेण, गोमूत्र स्लरी जैविक मिश्रण, गोखर खत, व्हर्मिवॉश, गांडूळ खतनिर्मिती प्रात्यक्षिके, शेणापासून मूल्यवर्धन, कुंड्या, पणती, मूर्ती, भेटवस्तू निर्मिती, बायोगॅस संयंत्राचे प्रकार आणि गॅस निर्मिती तंत्र, सौरऊर्जा वापराचे तंत्र याबाबतही शेतकऱ्यांना माहिती देण्यात येणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान, कृषी अवजारे आणि यंत्रेदेखील प्रदर्शित करण्यात आली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
