Shekhar Gaikwad Exclusive : कसा असणार यंदाचा ऊस गळीत हंगाम? किती होणार साखरेचं उत्पादन? साखर आयुक्तांची सविस्तर माहिती....
यंदाच्या गळीत हंगामाचं नियोजन कसं आणि त्याची पूर्वतयारी काय? तसेच यंदा उसाचं गाळप किती होणार? यासंदर्भातील सविस्तर माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.
Sugar Season 2022-23 : येत्या 15 ऑक्टोबरपासून यावर्षीचा ऊसाचा गळीत हंगाम (Sugar Season) सुरु होणार आहे. यावर्षी देखील राज्यात मोठ्या प्रमाणावर ऊसाचं क्षेत्र आहे. दरम्यान, यंदाच्या गळीत हंगामाचं नियोजन कसं आणि त्याची पूर्वतयारी काय? तसेच यंदा उसाचं गाळप किती होणार? यंदा राज्यातील किती साखर कारखाने सुरु होणार? यासंदर्भात एबीपी माझाने साखर आयुक्त शेखर गायकवाड ( Sugar Commissioner Shekhar Gaikwad) यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. शेखर गायकवाड नेमकं काय म्हणालेत ते पाहुयात...
14.87 लाख हेक्टर ऊसाचं क्षेत्र, 138 लाख टन साखरेचं उत्पादन होणार
ऊसाचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर गाळपासाठी साखर कारखाने सज्ज झाले आहेत. तसेच काही साखर कारखान्यांची छोटी मोठी कामं सुरु आहेत. यावर्षी 14.87 लाख हेक्टर ऊसाचं क्षेत्र असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. यावर्षीही ऊस लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळं यंदा साखरेच्या उत्पादन देखील वाढणार आहे. यंदा 1 हजार 443 लाख टन ऊसाचं गाळप होणार आहे. यावर्षी ऊस उत्पादकता ही 95 टन हेक्टरी आहे. तर यंदा 150 लाख टन साखरेचं उत्पादन होणार असल्याची माहितीही गायकवाड यांनी एबीपी माझाला दिली. मात्र, यातील 12 लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यात येणार आहे. त्यामुळं 12 लाख टन साखर कमी उत्पादीत होणार आहे. यंदा साखरेचं उत्पादन हे 138 लाख टन होणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.
यंदा 200 पेक्षा अधिक साखर कारखाने सुरु होणार
यावर्षीच्या गळीत हंगामात 200 हून अधिक सहकारी आणि खासगी साखर कारखाने सुरु होणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. 203 कारखाने यंदा सुरु होणार आहेत. यंदा काही बंद असलेलं कारखानं सुरु होत आहेत. त्यामुळं ऊस लवकर गाळपासाठी मदत होणार असल्याचे गायकवाड म्हणाले. यावरर्षी सरासरी साखर उतारा हा 11.20 टक्के असणार आहे. यावर्षीचा ऊसाचा गाळप हंगाम हा 160 दिवसांचा असणार आहे. मागील वर्षीचा ऊस गाळप हंगाम लांबला होता. मागील वर्षीचा गळीत हंगाम हा 173 दिवस चालला होता.
यंदा इथेनॉलचे 119 कोटी लिटर उत्दान होणार
यंदा इथेनॉलच्या उत्पादनात देखील मोठी वाढ होणार आहे. यंदा राज्यात 119 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती होणार असल्याची माहिती साखर आयुक्त गायकवाड यांनी दिली. तर पुढच्या वर्षी म्हणजे 2023-24 मध्ये 140 कोटी लिटरहून अधिक अथेनॉल निर्मिती होणार असल्याचे ते म्हणाले. येणाऱ्या काळात इथेनॉ निर्मितीवर भर देण्याचाही प्रयत्न असेल असे ते म्हणाले.
60 साखर कारखान्याकडे 300 कोटी रुपयांची थकबाकी
गेल्या हंगामात ऊस गाळप केलेल्या 60 साखर कारखान्यांकडे FRP थकीत आहे. जवळपास 300 कोटी रुपयांची शेतकऱ्यांची FRP कारखान्यांकडे थकीत आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची थकबाकी दिली जात नाही तोपर्यंत कारखाना सुरु करण्यासाठी परवाना देणार नसल्याचे शेखर गायकवाड यावेळी म्हणाले. पण 15 ऑक्टोबरच्या आत राहिलेल साखर कारखाने थकीत FRP देतील असेही गायकवाड यावेळी म्हणाले. जर FRP दिली नाही तर त्यांना साखर कारखाना सुरु करता येणार नाही, तरीही कारखाना सुरु केला तर प्रति दिन त्या कारखान्याला दंड आकारला जाईल असे गायकवाड यावेळी म्हणाले.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ऊस गळीत हंगाम चालणार
यंदाचा ऊस गळीत हंगाम हा मार्चच्या शेवटपर्यंत किंवा फार फार तर एप्रिलच्या पहिल्या आड्यापर्यंत चालेल अशी माहितीही साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. मागील वर्षीइतका ऊसाचा गळीत हंगाम यंदा लाबणीवर पडणार नाही. यंदा कारखान्यांची संख्याही वाढली आहे. तसेच दुसरं कारण म्हणजे यंदा खोडवा ऊसाचं क्षेत्र जास्त आहे, त्यामुळं ऊसाचं टनेज कमी होणार आहे, त्यामुळं हंगाम जास्त लांबणार नसल्याची माहिती शेखर गायकवाड यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या: