Unseasonal Rain News: मजुरी करुन जोपासली द्राक्ष बाग; पण अवकाळीनं केला घात, राजकारणी शेतकऱ्यांकडे पाहणार का?
अवकाळी पावसामुळे फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या वादळी वाऱ्यात अनेक द्राक्ष बागा भुईसपाट झाल्या आहेत.
Unseasonal Rain News: ऐन उन्हाळ्यात पुन्हा एकदा अवकाळीने सोलापूर जिल्ह्याला दणका दिला आहे. या अवकाळी पावसामुळे फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या वादळी वाऱ्यात अनेक द्राक्ष बागा भुईसपाट झाल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून वारंवार अवकाळी आणि वादळी वाऱ्याच्या संकटाने शेतकऱ्याला पुरते उध्वस्त करुन टाकले आहे. या नुकसानीनंतर शेतकरी नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आहेत. भोंग्यात मग्न असलेले राजयकर्ते शेतकऱ्यांकडे कधी पाहणार, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केलाय.
अवकाळी पावसाने पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, खर्डीसह अनेक गावातील द्राक्ष बागा भुईसपाट झाल्या आहेत. या पावसाचा फटका आंब्यालाही मोठ्या प्रमाणात बसला असून, शेकडो झाडांच्या कैऱ्या तसेच काही ठिकाणी तोडणीला आलेले आंबे पडल्याने शेतकऱ्यांच्या हातात आलेले फळ अवकाळीने हिरावून नेले आहे. कासेगाव परिसरातील नामदेव नवले या शेतमजुराने लोकांच्या शेतात कामे करुन आपली पाऊण एकर बाग जोपासली होती. मात्र आज सकाळच्या वादळी वारे आणि अवकाळीने सगळी द्राक्षांची बाग आडवी झाली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुले मोठे नुकसान जाले. यावेळी पावसामुळे वाया गेली. यामध्ये माझे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नवले यांनी सांगितले. बँकेच कर्ज घेतले होते, ते पुरले नाही म्हणून खासगी सावकाराचे कर्ज घेतल्याचे नवले यांनी सांगितले.
देशातील अनेक भागात पाऊस असल्याने गेल्या 15 दिवसात व्यापारी द्राक्षांच्या खरेदीसाठी आले नव्हते. गेल्या चार दिवसापासून पुन्हा द्राक्ष तोडणीला सुरुवात झाली आणि पुन्हा अवकाळीने दणका आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या फवारणीचा खर्च देखील निघणे मुश्किल झाले आहे. राज्य शासन आणि राज्यातील नेते भोंगे आणि इतर वादात मश्गुल असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे कोण पाहणार असा सवाल आता शेतकरी करु लागला आहेत.
या चार ते पाच दिवसापासून कासेगावमध्ये द्राक्षाच्या बागा उतरण्याचे काम सुरु आहे. तोपर्यंत पावसाने थैमान घातले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी योग्य दरही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याची माहिती द्राक्ष उत्पादक संघाचे संचालक प्रशांत देशमुख यांनी दिली. गेल्या वर्षी कोरोनाचा फटका आणि यंदा अवकाळीचा फटका बसल्याचे देशमुख यांनी सांगितले. या सरकारचे, राजकारणी लोकांचे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. कोणीही सरकारकडे लक्ष देत नसल्याचे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
- Unseasonal Rain News : पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, झाडे उन्मळून पडल्यानं सांगली-तासगाव रोडवरील वाहतूक ठप्प
- Solapur Rain : सोलापूर जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस, फळपिकांना फटका, शेतकरी चिंतेत