(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आनंदवार्ता! शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार, मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेसाठी निविदा अंतिम; 25,000 रोजगार निर्मिती होणार
Electricity for Farmers : हुडको (Hudco) कंपनीसोबत सामंजस्य करार झाला, या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 5000 कोटी देणार असंही उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं आहे
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज (Electricity) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांची ही मागणी सरकारकडून लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, ही सातत्याने होणारी मागणी होती, ही पूर्ण करणे आता शक्य होणार आहे. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्राच्या कृषि जगतात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केल्या.
शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी
शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्यातील कृषि क्षेत्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना 2.0 राबवत सरकारने शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 9000 मे वॅाट च्या कामाचे 'लेटर ऑफ अवॉर्ड' देत स्पर्धात्मक माध्यमातून निविदा अंतिम केल्या आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याची मागणी लवकरच पूर्ण होणार आहे.
40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी सरकारकडून 9000 मे वॅाट च्या निविदा अंतिम करण्यात आल्या असून यातून 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. तसेच, यामुळे 25,000 रोजगार निर्मिती होणार आहे. शेतकऱ्यांना 1.25 लाख रुपये प्रतिहेक्टर वार्षिक भाडे मिळणार आहे. 2025 मध्ये 40 टक्केकृषि फिडर सौर ऊर्जेवर येणार आहे. 18 महिन्यात प्रकल्प पूर्ण करण्याची सरकारची योजना आहे. दरम्यान, सोबत काम करत हा प्रकल्प 15 महिन्यात पूर्ण करण्याची भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. यावेळीत राज्यभरातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी 5000 कोटी देणार
आता उद्यापासून उर्वरित कृषि फिडर सौर ऊर्जेवर कसे येतील, याचं नियोजन सुरू करा. 8 लाख सौर ऊर्जा पंप सुद्धा आपल्याला द्यायचे आहेत असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. 2016 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ही संकल्पना साकारली होती. पहिला पायलट प्रकल्प अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धी येथे साकारला होता. त्या काळात 2000 मेगा वॅाट सौर ऊर्जा तयार झाली. आजच (Hudco) कंपनीसोबत सामंजस्य करार झाला, या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 5000 कोटी देणार असंही उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं आहे.