Raju Shetti : 'हा' शेतकऱ्यांसाठी विश्वासघातकी निर्णय, साखर निर्यातीसंदर्भातील निर्णयावरुन राजू शेट्टींचा केंद्रावर निशाणा
भारत सरकारने गव्हापाठोपाठ साखर निर्यातीसंदर्भात एक निर्णय घेतला आहे. या निर्णयावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
Raju Shetti on Sugar Export : केंद्र सरकारने साखर निर्यातीच्या बाबतीत महत्वाचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने गव्हापाठोपाठ साखर निर्यातीच्या संदर्भात एक निर्णय घेतला आहे. भारत सरकारची विशेष परवानगी असेल तरच बंदी काळात संबंधित देशात साखरेची निर्यात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. निर्याती संदर्भातील हा निर्णय 1 जून 2022 पासून लागू होणार आहे. आता 1 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत साखर निर्यातीसाठी सरकारची परवानगी आवश्यक असणार आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti ) यांनी जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी विश्वासघातकी निर्णय घेतला असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले शेट्टी
केंद्र सरकारने गव्हापाठोपाठ साखरेवर निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या परिस्थितीत देशामध्ये 80 लाख टन साखर शिल्लक आहे. पुढील चार महिन्यात नवा हंगाम सुरु होणार असून, देशाची गरज भागवून जवळपास 185 लाख टन साखर शिल्लक राहणार आहे. त्यातील किमान 100 लाख टन साखर पुन्हा निर्यातीसाठी उपलब्ध होणार आहे. अशा परिस्थितीत ब्राझीलसह इतर देशातील साखर उत्पादन वाढवल्यास बाजारपेठेत कमी दरानं साखर विकण्याची वेळ येईल हे माहित असून सुद्धा केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. सरकारनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी विश्वासघातकी निर्णय घेतल्याची टीका शेट्टी यांनी केली आहे.
साखर निर्यातीसाठी सरकारची परवानगी आवश्यक
दर नियंत्रणात ठेवणे आणि देशातील गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा करणे या उद्देशाने साखर निर्यातबंदी लागू करत असल्याचे भारत सरकारने म्हटलं आहे. साखरेवरील निर्यातबंदी 31 ऑक्टोबर 2022 किंवा पुढील आदेश यापैकी जे आधी येईल तिथपर्यंत लागू असणार आहे. आपल्या या निर्णयात केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घातलेले नाहीत. तर साखरेची निर्यात फ्री होती, ती आता रेग्युलेटेड श्रेणीत टाकली आहे. आता 1 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत साखर निर्यातीसाठी सरकारची परवानगी आवश्यक असणार आहे.
इतर देशात उसाचं उत्पादन घटलं
भारत हा साखरेचा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश तर आहेच पण साखरेच्या वापरातही पुढे आहे. साखरेच्या निर्यातीत जगातील अव्वल पाच देशांमध्ये अनुक्रमे ब्राझील, थायलंड, भारत, ऑस्ट्रेलिया आणि मेक्सिको या देशांचा क्रमांक लागतो. ब्राझील आणि थायलंडमध्ये पावसाची कमतरता आणि गारपीट यांमुळे उसाचं उत्पादन घटलं आहे. त्यामुळे साखरेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर 100 लाख टनांचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारतातील साखर निर्यातदारांनी या कमतरतेचा फायदा होणार आहे. मात्र, सरकारने आता निर्यातीच्या संदर्भात हा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या: