Cotton Price : कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत, 10 हजारांपेक्षा अधिकचा दर मिळावा, धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी
Cotton Price : कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. कापसाला 10 हजार रुपयांच्या पुढे दर मिळावा अशी मागणी धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
Cotton Price News : सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी (Cotton farmers) चिंतेत आहेत. कारण कापसाच्या दरात घसरण झाली आहे. धुळे (Dhule) जिल्ह्यातील शेतकरी विक्रीसाठी कापूस बाजारात आणत आहेत. मात्र, अचानक कापसाचे दर गडगडल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सध्या कापसाला सरासरी आठ ते साडेआठ हजार रुपयापर्यंतचा दर मिळत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी कापसाला दहा हजार रुपयांपेक्षा अधिकचा दर मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
12 हजारांचा दर आठ हजार रुपयांवर
गेल्या दोन दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाने उभारी घेतली आहे. कापसाच्या दरात सुधारणा झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, अचानक भाव गडगडल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कापसाला किमान दहा हजारांपेक्षा अधिक भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. धुळे जिल्ह्यात कापसाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. कापसाचा हंगाम नवरात्रीपासून सुरू झाला होता. 12 हजार 51 रुपये उच्चांकी भाव देऊन कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र महिन्याभरात ओला कापूस असल्याच्या कारणामुळे भाव गडगडले आहेत.
मध्ये प्रदेशात कापसाला नऊ हजार रुपयांचा दर
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी कापसाला सात ते आठ हजार पाचशे रुपयांचा वर्षातील नीचांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आंतरराष्ट्रीय तसेच देशातील बाजारात कापूस दर सुधारल्यानंतर शेजारील मध्य प्रदेश राज्यातील खेतिया बाजारात कापूस नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल या दराने विक्री झाला. त्यामुळं महाराष्ट्रात देखील कापसाला चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, कापसाचे दर खाली आल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या कापसाचे दर सरासरी आठ ते साडेआठ हजारपर्यंत आले आहेत. मात्र कापसाला दर दहा हजाराच्या पुढे मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. कापसाचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
एकीकडे कापूस चोरीच्या घटनांमध्ये वाढ तर दुसरीकडे...
एकीकडे राज्यात अनेक ठिकाणी कापूस चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. अशात आता दुसरीकडे कापसाचे दर घसरले आहेत. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात आहेत. कापूस चोरीच्या घटनेत वाढ झाल्यामुळं व्यापाऱ्यांनी फक्त शेतकऱ्यांकडूनच कापूस खरेदी करावा असं आवाहन नंदूरबार जिल्हा पोलिस (Nandurbar District Police) दलानं केलं आहे. तसेच अतिरिक्त कोणी संशयित कापूस विक्रीसाठी आला तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Cotton News : नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीला पोलिस, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडूनच कापसाची खरेदी करावी अन्यथा....