Farmers Agitation : ओला दुष्काळ जाहीर करा, संत्र्याला हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या, स्वाभिमानीचे मोर्शीत रास्ता रोको आंदोलन
ओला दुष्काळ जाहीर करावा आणि संत्र्याला हेक्टरी एक लाख रुपये मदत करावी, या मागण्यांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं अमरावती-नागपूर महामार्गावरील मोर्शी तालुक्यातील आंदोलन करण्यात आलं.
Farmers Agitation in Amravati : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भाला या अतिवृष्टीचा खूप मोठा फटका बसला आहे. यामुळं तेथील शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान,ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा आणि संत्र्याला हेक्टरी एक लाख रुपये मदत करावी, या मागण्यांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं अमरावती-नागपूर महामार्गावरील मोर्शी तालुक्यातील हिवरखेड याठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. संततधार सुरु असलेल्या पावसामुळं शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं मोर्शी-वरुड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. तसेच शेतीचे संपूर्ण पिककर्ज माफ करुन संत्रा गळतीसाठी हेक्टरी एक लाख रुपये द्यावेत. तसेच खरीप पिकासाठी हेक्टरी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी, अशी मागणी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. अमरावती-नागपूर हायवे रोडवर असलेल्या हिवरखेड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष दामू अण्णा इंगोले आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अतिवृष्टीनं राज्यातील 81 लाख 2 हजार हेक्टर जमीन बाधीत
दरम्यान, राज्यात अतिवृष्टीचा खूप मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. राज्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांची पिक वाया गेली आहेत. अतिवृष्टीनं राज्यातील 81 लाख 2 हजार हेक्टर जमीन बाधीत झाली आहे. यामध्ये जिरायती क्षेत्र 17 लाख 59 हजार 633 हेक्टर असून, बागायती क्षेत्र 25 हजार 476 हेक्टर आहे. फळ पिकांमध्ये 36 हजार 294 हेक्टर एवढे क्षेत्र बाधित झाले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अतिवृष्टी आणि पूर यामुळं आत्तापर्यंत सुमारे 138 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये तातडीची मदत केली आहे. 21 हजार व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर पूर स्थिती होती. पूरपरिस्थितीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी तत्काळ दौऱ्यावर जावून पूरग्रस्त भागाची पाहणी करुन तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या होत्या असे फडणवीस म्हणाले. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांवर संकट आल्या असल्याचे फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: