cotton News : कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी ड्रिप फर्टिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करणं काळाची गरज
कापूस पिकाचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी ड्रिप फर्टिगेशन करणे काळाजी गरज असल्याचे मत जैन इरिगेशन सिस्टीम्सचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे यांनी व्यक्त केले आहे.
Cotton News : आपल्या देशात कापूस (cotton) पिकाचे 122 लाख हेक्टर क्षेत्र आहे. तर उत्पादकता 469 किलो रुई प्रति हेक्टर आहे. तर जागतिक पातळीवर कापूस पिकाची उत्पादकता 791 किलो रुई प्रति हेक्टर आहे. देशात सरकीसह कापसाची उत्पादकता एकरी 5.64 क्विंटल आहे तर राज्यात सरकीसह कापसाची उत्पादकता खूप कमी म्हणजे एकरी 3.75 क्विंटल एवढीच आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांनी कापूस पिकाचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी ड्रिप फर्टिगेशन (ठिबक सिंचन आणि ठिबकमधून विद्राव्य खतांचा वापर) करणे काळाजी गरज असल्याचे मत जैन इरिगेशन सिस्टीम्सचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी विस्तार व प्रशिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. बी. डी. जडे (Dr.B D Jade) यांनी व्यक्त केले आहे.
कॉटन मिशनच्या माध्यमातून देशभरात मार्गदर्शन सुरू
कोरडवाहू कापूस शेतकऱ्यांनी एकरी 10 हजार कापसाची झाडे मिळतील अशी कापसाची जात आणि लागवडीचे अंतर निवडावे असेही जडे म्हणाले. कापूस संशोधन आणि विकास संघटना हिसार (हरियाना) यांनी भारतीय कृषी अनुसंधान संस्थान दिल्ली यांच्या संयुक्तवतीनं महाराणा प्रताप कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ उदयपूर (राजस्थान) येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय कापूस परिषदमध्ये तांत्रीक शोध निबंध सादरीकरण करताना डॉ. बी. डी. जडे बोलत होते. कोरडवाहू कापूस पिकाचे एकरी 10 क्विंटल आणि ठिबक सिंचनावर एकरी 20 क्विंटल उत्पादन कसे घ्यावे यासाठी कॉटन मिशनच्या माध्यमातून देशभरात मार्गदर्शन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या परिषदेसाठी कापूस पिकामध्ये काम करणारे पंजाब, हरीयाना, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू, तेलंगना आणि ओरिसा, दिल्ली येथील कृषी विद्यापीठांमधील शास्त्रज्ञ, संशोधक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर, सिरसा, कोईमतूर येथील शास्त्रज्ञ,खाजगी बियाणे, किटकनाशके, औजारे कंपन्याचे अधिकारी परिषदेमध्ये सहभागी झाले होते. राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, कृषी संशोधन केंद्र जळगाव चे डॉ. संजीव पाटील, डॉ. गिरीष चौधरी यांनी त्यांचे संशोधन सादर केले आहे.
कापसाची उत्पादकता वाढवसाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर, सिरसा, कोईमतूर, सिरकॉट मुंबई मधील शास्त्रज्ञ ह्यांनी या परिषदेमध्ये शोध निबंध सादर केले. कापूस पिकातील सुधारीत वाण, लागवडीचे अंतर, एकरी झाडांची संख्या, कापूस पिकातील किडी आणि रोग, यांत्रीकीकरण, कापूस वेचणी यंत्र या विषयावर परिषदेमध्ये शास्त्रज्ञांनी विचार मांडले. कापूस पिकाची उत्पादकता वाढवसाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे असल्याचे मत सीसीएस हरीयाना कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कुंभोज व्यक्त केले. डॉ सैनी यांनी आभार व्यक्त केले. कापूस क्षेत्रात काम करणारे अनेक लोकांनी ह्या परीषद मध्ये सहभाग घेतला.
महत्त्वाच्या बातम्या: