Nagpur : शेतमाल आणि पशू उत्पादनात मूल्यवर्धन करणे आवश्यकः डॉ. आशिष पातुरकर
प्रशिक्षण ही केवळ सुरुवात असुन शेतकऱ्यांनी तिथेच थांबू नये तर उद्योजक बनावे आणि कृषी विज्ञान केंद्र मार्फत आयोजित विविध शेती उपयोगी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
![Nagpur : शेतमाल आणि पशू उत्पादनात मूल्यवर्धन करणे आवश्यकः डॉ. आशिष पातुरकर Conducting two day plant pot planting, bee keeping workshop Nagpur : शेतमाल आणि पशू उत्पादनात मूल्यवर्धन करणे आवश्यकः डॉ. आशिष पातुरकर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/4a78a5bf53cb64816748d46ff234f1a01658722348_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : शेती हा भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांनी शेती सोबतच शेळी पालन, मत्स्य पालन, कुक्कुट पालन करावे, इतकेच नाहीतर पशू व शेती उत्पादनाचे मूल्यवर्धन करून आपले अर्थार्जन वाढवावे. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीला चालना देत 'रोप वाटिका लागवड' आणि 'मधमाशी पालन' सारखे शेतीपूरक व्यवसाय करणे आज काळाची गरज आहे त्याकरिता प्रशिक्षण आवश्यक आहे असे प्रतिपादन मा. कर्नल. प्रा. (डॉ.) आशिश पातुरकर, कुलगुरू, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांनी केले.
ते महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, दुधबर्डी, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि वनस्पती मंडळ, पुणे आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय 'रोप वाटिका लागवड' आणि 'मधुमक्षिका पालन प्रशिक्षण' कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विस्तार शिक्षण, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे संचालक प्रा. डॉ. अनिल भिकाने, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित, पुणे येथील व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, रविंद्र भोसले, विभागीय कृषी सहसंचालक नागपूर, डॉ. सारीपुत लांडगे, आयोजक तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, दुधबर्डी, हेमंत जगताप, प्रशिक्षण अधिकारी, एम.सी. डी. सी. पुणे, डॉ. अश्विनी गायधनी, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) तथा प्रशिक्षण समन्वयक आणि कु. मयुरी ठोंबरे, विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) तथा प्रशिक्षण समन्वयक कृषी विज्ञान केंद्र हे मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ.अनिल भिकाने यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या शेती उपयोगी प्रशिक्षण घेण्याच्या सकारात्मक मानसिकतेचे कौतुक करत, प्रशिक्षण ही केवळ सुरुवात असुन शेतकऱ्यांनी तिथेच थांबू नये तर उद्योजक बनावे आणि कृषी विज्ञान केंद्र मार्फत आयोजित विविध शेती उपयोगी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असा संदेश दिला. शेतकऱ्यांनी आपल्यातल्या क्षमता जाणून त्यानुसार विविध शेती उपयोगी तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी,असा संदेश मिलिंद आकरे यांनी दिला तसेच रविंद्र भोसले, यांनी कृषी विभागा मार्फत उपलब्ध शेती पूरक योजनांचा लाभ घेऊन वैज्ञानिक शेती करावी आणि भरघोस उत्पादन घ्यावे असे आवाहन केले.
प्रशिक्षणामुळे शेती व्यवसायातील नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत
कृषि विज्ञान केंद्र हे नेहमीच शेतकर्यांकरिता विविध प्रशिक्षण आयोजित करीत असल्यामुळे शेती व्यवसायातील नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहचते, त्यामुळे या संधींचा शेतकऱ्यांनी लाभ घावा असे प्रतिपादन डॉ. सारीपुत लांडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकेत केले तर हेमंत जगताप यांनी एम सी डी सी मार्फत विविध प्रशिक्षण आयोजित करण्याची हमी प्रशिक्षणार्थींना दिली. सहभागी प्रशिक्षणार्थी शाह यांनी अभिप्रायात शेतकऱ्यांना त्यांचे अर्थार्जन वाढवण्यासाठी विविध शेती उपयोगी प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र मार्फत मिळत असल्यामुळे प्रशिक्षण घेणे किती फायद्याचे आहे हे उपस्थित शेतकऱ्यांना पटवून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अश्विनी गायधनी तर आभार मयुरी ठोंबरे यांनी मानले. 'रोप वाटिका लागवड' प्रशिक्षणाला 55 तर 'मधुमक्षिका पालन' प्रशिक्षणाला 40 असे एकूण 95 शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन गौतम, पूजा वासाडे , राजेश गहलोद आणि राकेश खोब्रागडे यांनी परिश्रम घेतले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)