Gopichand Padalkar: आटपाडी बाजार समितीच्या सभापती पदीच्या निवडीत आमदार गोपीचंद पडळकर यांना धक्का; शिंदे गटाचा उमेदवार विजयी
Sangli APMC News: आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना धक्का देत शिवसेना शिंदे गटाने (Shiv Sena Shinde Faction) झेंडा फडकवला आहे.
Sangli News: अत्यंत संवेदनशील आणि रोमहर्षक निवडणूक झालेल्या सांगलीच्या आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना धक्का देत शिवसेना शिंदे गटाने (Shiv Sena Shinde Faction) झेंडा फडकवला आहे. आज झालेल्या सभापती निवडीमध्ये सभापती पदी शिवसेना शिंदे गटाचे संतोष पुजारी, तर उपसभापतीपदी काँग्रेसचे राहुल गायकवाड यांची निवड झाली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजीराव पाटील यांनी धक्कातंत्राचा वापर करत गुप्त पद्धतीने झालेल्या मतदानामध्ये विरोधकांना गाफील ठेवत 10 विरुद्ध 8 मताने विजय मिळविला. दोन्ही गटाच्या 9-9 अशा समान जागा निवडून येऊनही शिवसेना शिंदे गटाने बाजार समितीवर सत्ता स्थापन करण्यात यश मिळवल्याने हा भाजप आमदार गोपीचंद पडळकर याना धक्का मानला जात आहे. सभापती निवडीमध्ये भाजपा-राष्ट्रवादीच्या युतीकडून सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख तर उपसभापती पदासाठी दादासाहेब हुबाले यांनी अर्ज दाखल केला होता. तर शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रीय काँग्रेस व रासपाच्या आघाडी कडून सभापती पदासाठी शिवसेनेच्या संतोष पुजारी तर उपसभापती पदासाठी काँग्रेसच्या राहुल गायकवाड यांनी अर्ज दाखल केला होता. दोन्ही गटाकडून उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने दुपारी दोन वाजता गुप्त मतदान पार पडले.
मतदानांतर लगेचच मतमोजणी करण्यात आली यावेळी शिवसेनेच्या संतोष पुजारी व काँग्रेसच्या राहुल गायकवाड यांना प्रत्येकी दहा तर राष्ट्रवादीच्या हणमंतराव गायकवाड व दादासाहेब हुबाले यांना प्रत्येकी आठ मतदान झाले.
भाजपचे एक मत फुटल्याने आटपाडी बाजार समितीच्या सभापती पदी शिवसेना शिंदे गटाचे संतोष पुजारी यांची निवड झाली, तर उपसभापतीपदी काँग्रेसचे राहुल गायकवाड यांची निवड झाली. बाजार समितीमध्ये भाजप-राष्ट्रवादी आणि शिवसेना-काँग्रेस अशा दोन्ही पॅनेलला समान 9 जागा मिळाल्या होत्या. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रीय समाज पार्टी यांनी एकत्र येउन ही निवडणुक लढवली होती.
भाजपचे माजी आमदार राजेंद्र देशमुख, आ. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला सोबत घेउन पॅनेल निवडणुक मैदानात उतरले होते. दोन्ही पॅनेलचे प्रत्येकी 9 उमेदवार विजयी झाल्याने सभापती व उपसभापती निवडणुकीत तीव्र चुरस निर्माण झाली होती. गुरूवारी सभापती व उपसभापती निवडी झाल्या. गुप्त मतदानाद्बारे सभापती व उपसभापती निवडण्यात आला. यामध्ये एका मताने पुजारी व गायकवाड यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
आटपाडी बाजार समितीवर आजपर्यंत देशमुख गटाचे वर्चस्व राहिले होते. यंदा अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत जिल्हा बँकेचे संचालक पाटील यांनी देशमुख गटाला चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पाटील यांनी देशमुख यांचा पराभव केला होता. आता बाजार समितीतही भाजपमध्ये फूट पाडून बाजार समितीची सत्ता हस्तगत केली आहे.