Jagdeep Dhankhar : कृषीक्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा, देशाच्या विकासात अन्नदात्याचं व्यापक योगदान : उपराष्ट्रपती
Jagdeep Dhankhar : कृषीक्षेत्र (Agriculture sector) हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे गौरवोद्गार देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी काढले.
Jagdeep Dhankhar : कृषीक्षेत्र (Agriculture sector) हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे गौरवोद्गार देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी काढले. देश उभारणीत 'अन्नदात्याच्या' योगदानाची दखल धनखड यांनी घेतली. जगदीप धनखड यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय कृषी संशोधन संस्थेचा (Indian Agricultural Research Institute)चा 61 वा दीक्षांत समारंभ झाला. या कार्यक्रमात धनखड बोलत होते. देशाच्या प्रगतीसाठी कृषीशिक्षण, संशोधन, अभिनव प्रयोग केंद्रस्थानी असायला हवेत अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
कोरोना काळात कृषी क्षेत्रानं अन्नसुरक्षेची जबाबदारी समर्थपणे पार पाडली
देशाच्या सर्वांगीण विकासात अन्नदात्याच्या व्यापक योगदानाची यथोचित दखल उपराष्ट्रपतींनी घेतली. जेव्हा संपूर्ण जग, कोविडच्या संकटाचा सामना करत होतं, अशा स्थितीत सुद्धा, देशातील 80 कोटी लोकांच्या अन्नसुरक्षेची जबाबदारी समर्थपणे कृषी क्षेत्रानं पार पाडल्याचे धनखड म्हणाले. कृषीव्यवस्था, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे ते म्हणाले. 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्याच्या भारताच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. जगभरातील कृषी क्षेत्रासाठी हा उपक्रम किती महत्वाचा असल्याचे ते म्हणाले. आज कृषी क्षेत्रात ड्रोनसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा होत असलेला वापर, बदलत्या काळानुरूप या क्षेत्रातही आमूलाग्र बदल घडत असल्याचे धनकड म्हणाले.
11.4 कोटी शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे. आतापर्यंत 11.4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असल्याचे धनखड म्हणाले. आयसीएआर- आयएआरआय या कृषी अध्ययन संस्थेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज सर्वच क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत. ते खऱ्या अर्थाने भारताचे प्रतिनिधित्व करतात, असे धनखड म्हणाले. अत्यंत विश्वासार्ह, ध्येयनिष्ठ आणि मिशन मोडवर काम करणाऱ्या संस्थेतून हे विद्यार्थी समाजाला आपले सर्वकाही अर्पण करण्यासाठी बाहेर पडतात असेही ते म्हणाले.
संसद देशाचे मंदिर, ते गोंधळाचे ठिकाण बनू नये
युवा पिढीने भारताच्या आजवरच्या कामगिरीबद्दल अभिमान बाळगायला हवा. लोकशाहीची जननी म्हणून विश्वासार्हता मिळवलेल्या आपल्या देशाकडे युवकांनी अभिमानाने बघावं, असंही धनखड म्हणाले. आपली संसद देशाचे मंदिर असल्याचे ते म्हणाले. ते स्थान, संवाद, विवाद, चर्चा आणि मंथन यासाठी आहे. त्यामुळं ते गदारोळ आणि गोंधळाचे ठिकाण बनू नये, असे आवाहन त्यांनी केलं. राज्यघटनेच्या कलम 105 अन्वये नागरिकांना मिळालेले विशेषाधिकार मोठ्या जबाबदारीसह येतात आणि या जबाबदाऱ्या चुकीच्या नाहीत, असे उपराष्ट्रपती धनखड म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: