Agriculture News : आंब्यापेक्षा जांभळं महाग, एक जांभूळ दहा रुपयाला; किलोचा दर चारशे रुपयांवर
Agriculture News : विशेष म्हणजे यावेळी झालेल्या परतीच्या पावसाचा मोठा फटका जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याने आवक देखील कमी झाली आहे.
Agriculture News : सध्या आंब्याचा (Mango) सीजन सुरु आहे. त्यामुळे आंब्यांना चांगले दर मिळत आहे. पण अशात आंब्यांना जांभळाने (Jambhul Fruit) मागे टाकले आहे. कारण आंब्यापेक्षा जांभळं महाग झाली आहेत. विशेष म्हणजे एक जांभूळ दहा रुपयाला मिळत असून, किलोचा दर चारशे रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा दिलासा मिळत आहे. विशेष म्हणजे यावेळी झालेल्या परतीच्या पावसाचा मोठा फटका जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याने आवक देखील कमी झाली आहे. त्यामुळे यंदा जांभळाला चांगला दर मिळत आहे.
काळेभोर जांभूळ डोळ्यासमोर आलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. मात्र आता त्याच जांभळाला सोन्याचा दर मिळतोय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. त्याचं कारण म्हणजे जांभळाला एका किलोचा भाव हा चारशे रुपयापर्यंत झाला आहे. विशेष म्हणजे एक किलोमध्ये येणाऱ्या जांभळांची संख्या पाहिली तर एक जांभूळ दहा रुपयाला पडतोय. छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडीवर विक्रीसाठी आलेल्या दोन टोपल्या प्रत्येकी 16 हजार रुपयाला विकत आहेत. महत्वाचे म्हणजे एवढा दर असून देखील ही जांभळं तासाभरात हातोहात विकतायत.
यामुळे वाढले दर....
छत्रपती संभाजीनगर शहरातील जाधव मंडीत सध्या जांभळाला एका किलोचा भाव हा चारशे रुपये मिळत आहे. विशेष म्हणजे यंदा जांभळाची आवक कमी झाली आहे. त्याचे कारण म्हणजे परतीच्या पावसामुळे झाडाला लागलेल्या बारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यात जोरदार वारा असल्याने बार गळून पडला होता. त्यामुळे बाजारात जांभळाची आवक कमी झाली आहे. त्यातच गावरान जांभूळ बाजारात येण्यासाठी आणखी एखाद्या आठवड्याचा वेळ आहे. त्यामुळे सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या जांभळाला चांगले दर मिळत आहे.
कंपन्यांची मागणी वाढली...
जांभळाचं उपयोग औषधी उत्पादनासाठी देखील केला जातो. विशेष म्हणजे शुगरसाठी आणि त्याच्या औषधी उत्पादनासाठी जांभळाची मोठी मागणी आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांकडून जांभूळ फळासाठी मागणी असते. तर अनेक शेतकऱ्यांकडून कंपनी थेट खरेदी करत असल्याने आणि कंपनीकडून बाजारभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने जांभूळ उत्पादक शेतकरी कंपनीलाच विकण्यासाठी प्राधान्य देतात. त्यात स्वतः कंपनी शेतात येऊन माल खरेदी करत असल्याने वाहतुकीचा खर्च देखील वाचत आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर जांभूळ कंपनीत जात असून, बाजारात दिवसेंदिवस त्याची आवक कमी होत आहे. तर आवक कमी झाल्याने दर देखील वाढत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: