Papaya : पपईची आवक वाढली, दरात घसरण; आजपासून पपईसाठी नवे दर लागू
Papaya : बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पपईची आवक वाढली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला आहे.
Papaya : सध्या वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. याचा परिणाम शेती पिकांवर (Agriculture Crop) होत आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळं शेतकऱ्यांनी (Farmers) पपईच्या काढणीला वेग दिला आहे. याचा परिणाम बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पपईची आवक वाढली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला आहे. पपईच्या दरात प्रति किलो 1.25 पैशांनी कमी झाले आहेत. नंदुरबारमध्ये (Nandurbar) व्यापारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या पपईला प्रति किलोला 16 रुपयांचा दर
देशातील सर्वात मोठा प्रकल्प उत्पादक बेल्ट म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीतून पपईचे दर ठरत असतात. शेतकरी प्रतिनिधी आणि व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकीत पपईचे दर निश्चित करण्यात आले आहेत. सध्या पपईला 16 रुपये प्रति किलो दर देण्यात आला असून, पुढील बैठकीपर्यंत हा दर कायम राहील, अशी माहिती बाजार समितीच्या वतीनं देण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात तापमान 32 अंश सेल्सिअसच्या वरती गेले आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी पपईच्या काढणीला वेग दिला आहे.
आवक वाढल्यामुळं उत्तरेकडील राज्यांमध्ये पपईला मागणी कमी
सध्या शेतकरी पपईची वेगवान काढणी करत आहेत. त्यामुळ बाजारपेठेत पपईची आवक वाढली आहे. वाढत्या आवकेमुळं आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये मागणी कमी झाल्यानं व्यापारी आणि शेतकरी यांच्या झालेल्या बैठकीत दर एक रुपयाने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनी दिली.
नंदुरबारसह गुजरातच्या सीमावरती भागात पपईची मोठ्या प्रमाणात लागवड
नंदुरबार जिल्हा आणि शेजारील गुजरातच्या सीमावरती भागातील तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पपईची लागवड केली जात असते. यावर्षी पपईला चांगले तर मिळत असल्यानं पुढच्या वर्षी पपईच्या क्षेत्रांमध्ये अजून वाढ होईल असा अंदाज पपई आणि केळी उत्पादक संघाचे अभिजीत पाटील यांनी दिली आहे. पपई आणि केळीच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाल्यानं उत्पादनातही वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शेतकरी आणि व्यापारी यांच्या समन्वयातून पपईचे दर निश्चित
पपईचे दर ठरवताना शेतकरी आणि व्यापारी यांच्या समन्वयातून ठरत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसत नसल्याचे चित्र दिसत आहे. शहादा बाजार समिती शेतकरी प्रतिनिधी आणि व्यापारी यांच्यात दर पंधरवड्याला बैठक होते. यामध्ये बाजाराच्या स्थितीचा विचार करुन पपईचे दर कमी जास्त केले जात असल्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यातील वाद मिटला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :