धक्कादायक! महाराष्ट्रात 10 महिन्यात तब्बल 2478 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा, राज्य सरकारची कबुली
सततची नापिकी आणि शेतमालाला भाव नसणं अशा कारणामुळं राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. राज्य सरकारनं दिलेल्या माहितीतून धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
Maharashtra Assembly Winter Session 2023 : सततची नापिकी आणि शेतमालाला भाव नसणं अशा कारणामुळं राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या (farmers) आत्महत्या वाढत आहेत. राज्य सरकारनं (State Govt) विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याची कबुली दिली आहे. त्यासोबतच आकडेवारी देखील दिली आहे. जानेवारी 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 या 10 महिन्यांच्या काळात महाराष्ट्रमध्ये 2478 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. यामध्ये अमरावती विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्येची प्रकरणं समोर आली आहेत.
कोणत्या विभागात किती आत्महत्या?
अमरावती विभागात - 951
छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागात - 877
नाशिक विभागात - 254
नागपूर विभागात - 257
पुणे विभागात - 27
लातूर जिल्हा - 64
धुळे जिल्हा - 28
अशा एकूण 2478 शेतकरी आत्महत्येची प्रकरण राज्यभरातून समोर आली आहेत. जानेवारी ते ऑक्टोबर महिन्या दरम्यान समोर आल्याची माहिती लेखी उत्तरात राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
शेतकरी आत्महत्येवरुन विविध प्रश्न उपस्थित होतायेत?
राज्यात विविध कारणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाल्याबाबत विविध प्रश्न समोर येत आहेत. राज्यात सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, हवामानातील बदल, शेत मालाला भाव नसणे इत्यादी अनेक कारणास्तव मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय? असल्यास, अमरावती 637, औरंगाबाद 584, नाशिक 174, नागपूर 144, पुणे 16, लातूर 98, मराठवाडा 685, धुळे या व्यतिरिक्तही राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त भागाकडे शासनाने विशेष लक्ष देवून आत्महत्यांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण करुन या आत्महत्या रोखण्यासंदर्भात शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे? असा सवालही करण्यात येत आहे. या प्रकरणी शासनाचे चौकशी करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन तसेच त्यांना आर्थिक मदतीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे. नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना काय?
कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना समुपदेशनाची व प्रबोधनाची आवश्यकता विचारात घेऊन विविध उपाययोजना राबवल्या जातात. विशेष मदतीच्या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्य विकासासाठी "कृषी समृध्दी" योजनेच्या अनुषंगाने विविध विभागांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. शेतमालाला हमीभाव, PM-KISAN सारख्या योजनांमार्फत शेतकऱ्यांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना केवळ1 रूपया भरून पिक विमा योजनेचा लाभ देण्याकरिता "सर्वसमावेशक पिक विमा योजना" सन 2023-24 पासून राबविण्यास दिनांक 23 जून, 2023 च्या कृषी विभागाच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाकडून प्रतिवर्ष रुपये 6000 शेतकऱ्यांना देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना कृषी मार्फत राबविण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून अथवा वेळ प्रसंगी राज्य शासनाच्या निधीतून निकषाबाहेर मदत दिली जाते, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Maharashtra Suicide Cases : महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या; देशात दर तासाला 19 आत्महत्या; गरीबी, बेरोजगारीमुळे जगणं असह्य