Deepti Sharma : दीप्ती शर्माची कमाल, 360 डिग्री फिरून श्रीलंकेच्या खेळाडूला केलं रन आऊट, पाहा VIDEO
IND W vs SL W T20 : महिला आशिया चषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारताने श्रीलंका संघावर विजय मिळवला असून या सामन्यात स्टार अष्टपैलू दीप्ती शर्माने कमाल फिल्डींगचं दर्शन घडवलं.

Deepti Sharma in India vs Sri Lanka : महिला आशिया कप 2022 स्पर्धेच्या (Womens Asia Cup 2022) दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंका संघाला 41 धावांनी मात दिली. सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 151 धावांचं लक्ष्य दिलं असता श्रीलंका संघ 109 धावांवर सर्वबाद झाला. दरम्यान या सामन्यात भारताची स्टार अष्टपैलू दीप्ती शर्माने (Deepti Sharma) दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या असून एक दमदार रनआऊटही केला.
काही दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांवेळी मांकडिंगने विकेट घेतल्याने चर्चेत आलेल्या दीप्तीने आपली कमाल कामगिरी कायम ठेवली आहे. तिने श्रीलंका संघाविरुद्धही उत्कृष्ट रनआऊट घेतला. 5 वं षटक सुरु असताना सामन्यात श्रीलंकेची फलंदाज मलेशा शेहानी थोड्या धीम्या गतीनं रन घेत होती, त्याचवेळी दीप्तीनं अगदी चपळाई दाखवत 360 डिग्री फिरत थ्रो केला आणि शेहानीला धावचीत केलं. हाच तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ-
— cricket fan (@cricketfanvideo) October 1, 2022
सामन्याचा लेखा-जोखा
बांग्लादेशच्या एसआयसीएस ग्राऊंड 2 (SICS Ground 2) येथे पार पडलेल्या सामन्यात सर्वात आधी श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या गोलंदाजीची सुरुवातही चांगली केली. भारताच्या सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना अनुक्रमे 10 आणि 6 धावा करुन तंबूत परतल्या. त्यानंतर युवा फलंदाज जेमिमा रॉड्रीग्जने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत मिळून एक चांगली भागिदारी रचली. 33 धावा करुन कौर बाद झाली. पण जेमिमाने आपली झुंज कायम ठेवली. उर्वरीत फलंदाजांनी खास साथ दिली नसली तरी जेमिमाने 76 धावांची दमदार खेळी खेळत भारताची धावसंख्या पुढेपर्यंत नेली. भारताने 151 धावांचे लक्ष्य श्रीलंकेसमोर ठेवले. 151 धाव करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंका संघावर भारताने सुरुवातीपासून दबाव कायम ठेवला. हर्षिता मडवी 26 आणि हसिनी परेराच्या 30 धावा सोडल्या तर इतर श्रीलंकन महिलांना खास कामगिरी करता आली नाही. भारतीय महिलांनी मात्र आपली भेदक गोलंदाजी अखेरपर्यंत सुरु ठेवत श्रीलंकेला 18.2 षटकात 109 धावांवर सर्वबाद केलं. भारतासाठी दयालन हेमलथाने 3, पुजा वस्त्रकर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 तर राधा यादवने 1 विकेट घेतली.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
