Sushilkumar Shinde : विलासराव देशमुखांनी आणलेल्या कागदावर सही केली अन् फसलो, शरद पवारांना मान्य होतं नव्हतं; सुशीलकुमार शिंदेंनी सांगितला किस्सा
Sushilkumar Shinde : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह पाटील यांच्याकडून माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते.

Sushilkumar Shinde, अकलूज : "एक घटना अशी झाली की, तुम्हा सर्वांना माहिती आहे. दो हंसो का जोडा म्हणजे मी आणि विलासराव देशमुख..पक्के मित्र होतो. मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष होतो. एकेदिवशी असाच विलासराव देशमुखांनी कागद आणला आणि सही करा म्हणाले. मित्रावर विश्वास ठेवला आणि सही केली. तो कागद होता मुख्यमंत्री शरद पवार यांना काढून टाका आणि दुसऱ्याला मुख्यमंत्री करा. मी फसलो होतो, पण शरदरावांना अखेर पर्यंत खरं वाटतं नव्हतं. पण मित्राकरिता फसलो होतो. मी त्याची कबुली जाहीरपणाने दिली. बरेच दिवस शरद पवारांना मान्य होत नव्हतं", असा किस्सा देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितला. ते अकलूजमधील कार्यक्रमात बोलत होते.
मी आणि विजयदादा एकमेकांविरोधात बाह्या सारुन आलो नाही
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, तुम्हा सर्वांना माहिती आहे, की मी आणि विजयदादा कधीना कधी भांडलो असेल. तेवढ्यापुरत आम्ही भांडलो, पण एकत्रित राहिलो. आम्ही दोघेही कधी एकमेकांच्या विरुद्ध बाह्या सारुन आलो नाही. पवार साहेबांनीच मला राजकारणात आणलं. मी सब इन्स्पेक्टर माणूस माझी हिंमत नव्हती. मी लांबून सॅल्यूट मारणारा होतो. शरद पवार तेव्हा गृहखात्याचे राज्यमंत्री होते. आम्ही त्यांच्यापुढे घाबरुन राहायचो. मित्र होते क्षीराम लेले म्हणून...ते मला त्यांच्याकडे घेऊन गेले होते. मला राजकारणात का येत नाही? विचारत होते. मी त्यांना सांगितलं मी जरुर येणार आहे. पण योग्य परिस्थिती आल्यानंतर येईल. मग म्हणाले आता योग्य परिस्थिती आली आहे.
कायद्याने भरता येत नाही, पण शरद पवारांचे चोहीकडे वजन होतं
पुढे बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, मी पोलीस अधिकारी होतो, तेव्हा अर्ज भरण्यात आला. ते कायद्याने भरता येत नाही, पण शरद पवारांचे चोहीकडे वजन होतं. जोग नावाचे डिसीपी होते. त्यांना सांगितलं की, आम्ही सुशीलकुमार शिंदेंचा अर्ज घेतोय. त्यानंतर ते बिचारे काही बोलले नाहीत. माझा अर्ज रेटला गेला, पण माझ्या डिसीपींनी मला बोलावलं. मला म्हणाले, तुमचं करियर चागलं आहे, अनेक रिवॉर्ड मिळालेत. पुढे मोठे व्हाल. राजकारणात पडू नका. काँग्रेसवाल्यांच्या नादाला लागू नका. मी म्हटलं ठीक आहे. मला वकिलीचं करायची आहे. ज्या कोर्टात चपरासी आहे, त्याच कोर्टात वकिल व्हायचंय. त्यामुळे मी नोकरी सोडू इच्छितो, अशी भूमिका त्यांना सांगितली.
आजचा कार्यक्रम मोहिते पाटील कुटुंबियांनी आयोजित केला होता. शरदचंद्रजी पवार त्याला कारणीभूत आहेत. कारण असं कधी होतं नाही, आणि आजवर झालं नाही. मी विजयदादांचा सत्कार करावा किंवा त्यांनी माझा सत्कार करावा असं कार्यक्रमात झालं असेल. पण विशेष कार्यक्रम ठेऊन करावा, हे शरद पवार यांच्या सांगण्यामुळे झालेलं आहे. त्याचा सर्व सहकाऱ्यांनी स्वीकार केला. मी मोहिते पाटील कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो. सत्कार करायलाही मोठं मन लागतं, असंही सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
