Apple Store : देशातलं 'Apple'चं पहिलं स्टोअर मुंबईत, Tim Cook यांच्या उपस्थितीत उद्घाटन
अॅपलचं देशातलं पहिलंवहिलं रिटेल स्टोअर मुंबईत सुरु झालंय. वांद्रे कुर्ला संकुलातल्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह माॅलमधल्या या स्टोअरचं उद्घाटन आज अॅपलचे सीईओ टीम कूक यांच्या हस्ते पार पडलं. अॅपल स्टोअरच्या उद्घाटनासाठी आलेल्या ग्राहकांचं दस्तुरखुद्द टीम कूक यांनीच स्वागत केलं. राजस्थानमधील एक युवक सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून स्टोअर सुरु होण्याची वाट पाहात रांगेत उभा होता. त्यानंतरही अनेक अॅपलप्रेमींनी पहाटेपासून रांग लावल्याचं पाहायला मिळालं. जिओ वर्ल्ड ड्राईव्ह माॅलमधलं अॅपल स्टोअर २२ हजार चौरस फुटात उभारण्यात आलं आहे. मुंबईचं हे स्टोअरही न्यूयाॅर्क, बीजिंग आणि सिंगापूरमधल्या अॅपल स्टोअरच्या धर्तीवरच उभारण्यात आलं आहे. मुंबईतल्या अॅपलच्या स्टोअरच्या भिंतींवर मुंबईच्या काळ्यापिवळ्या टॅक्सींमधून प्रेरणा घेऊन पेंटिंग्ज साकारण्यात येणार आहे. या स्टेअरमध्ये अॅपलची सर्व गॅजेट्स उपलब्ध आहेत. अॅपलच्या भारतातल्या पंचविसाव्या वर्षानिमित्त मुंबईत देशातलं पहिलं स्टोअर सुरु करण्यात आलं आहे. दरम्यान, २० एप्रिल रोजी नवी दिल्लीत देशातलं दुसरं अॅपल स्टोअर सुरु करण्यात येईल.