(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Neeraj Chopra : जागतिक भालाफेकीत नीरज चोप्रा चौथ्या प्रयत्नानंतर दुसऱ्या स्थानी ABP Majha
World Athletics Championships 2022: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. जागतिक अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेत नीरजनं भारताचा कित्येक वर्षांचा दुष्काळ संपवत रौप्यपदक पटकावलं आहे. त्याला या स्पर्धेत सुवर्णवेध घेता आला नाही मात्र त्यानं कडवी झुंज देत रौप्यपदक मिळवलं.
नीरज चोप्राचा पहिला थ्रो फाऊल ठरला तर दुसऱ्या थ्रोमध्ये वापसी करताना त्यानं 82.39 मीटर भाला फेकला. तर नीरज चोप्रानं आपल्या तिसऱ्या प्रयत्नात 86.37 मीटर भाला फेकत पुन्हा वापसी केली. या प्रयत्नात नीरज पाचव्या स्थानावरुन चौथ्या स्थानी आला. नीरज चोप्रा चौथ्या प्रयत्नानंतर दुसऱ्या क्रमांकावर आला. नीरजने चौथ्या प्रयत्नानंतर 88.13 मीटर्सवर भाला फेकला. हाच त्याचा सर्वोत्कृष्ट थ्रो ठरला.
जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राच्या कामगिरीकडे लक्ष होतं. काल 88.39 मीटर भाला फेकत भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला होता. मात्र आज त्याची सुरुवात निराशाजनक झाली. फायनलमध्ये नीरजचा पहिला थ्रो फाऊल ठरला.
ग्रेनेडाचा अँडरसन वन पीटर्सनं सुवर्णपदक जिंकलं आहे. त्यानं पहिल्या प्रयत्नात 90.21 मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात 90.46 मीटर भाला फेकला.
नीरजच्या या पदकानं भारताचा जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील पदकांचा दुष्काळ संपला आहे. भारताच्या एकाही अॅथलिटला गेल्या 19 वर्षांत जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेचं पदक मिळवता आलेलं नव्हतं. 2003 सालच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्जनं लांब उडीचं कांस्यपदक पटकावलं होतं. त्यानंतर जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय अॅथलिट्सच्या वाट्याला आलेला पदकांचा दुष्काळ नीरज चोप्रा दूर करेल, असा विश्वास होता. हा विश्वास नीरजनं सार्थ ठरवत रौप्यपदक जिंकलं आहे.