(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajinkya Rahane : ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजयातील श्रेय दुसऱ्यानेच लाटले : अजिंक्य रहाणे
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. तत्कालीन कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वामध्ये टीम इंडियाने ही कमाल करुन दाखवली होती. मात्र या ऐतिहासिक मालिका विजयातील माझे श्रेय दुसराच व्यक्ती घेऊन गेला असा आरोप क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने केलाय. खराब फॉर्ममुळे टीकाकारांच्या रडावर आहे. त्याच्याकडील उपकर्णधारपदही काढून घेण्यात आले होते. मात्र एका कार्यक्रमात त्याने आपली निराशा व्यक्त केल्याने सर्वांनाच धक्का बसलाय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात भारताचा ३६ धावांत खुर्दा उडाला. या लाजिरवाण्या पराभवानंतर कोहली पितृत्त्व रजा घेऊन मायदेशी परतला आणि भारताची धुरा तत्कालीन उपकर्णधार रहाणेने सांभाळली. त्यानंतर अजिंक्यच्या झुंजार शतकाने भारताने मेलबर्न कसोटीत विजय मिळवला. सिडनी कसोटी अनिर्णित राखण्यातही यश आलं. त्यानंतर अनेक प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही भारताने चौथ्या कसोटीत विजय मिळवत मालिका खिशात घातली होती. मात्र या विजयाचे श्रेय दुसऱ्याने हिरावल्याचा आरोप अजिंक्यने केलाय. अजिंक्यने आपली निराशा व्यक्त करता कुणाचाही उल्लेख केला नाही. मात्र, त्याचा इशारा तत्कालीन प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर असल्याचं बोललं जातंय.