यूपीत हाथसर, बलरामपूर, बुलंदशहरमध्ये अत्याचाराच्या घटना, Hathsarमध्ये कार्यकर्त्यांना रोखलं
हाथरस: उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर पीडितेचं अंत्यसंस्कार तिच्या परिवाराचं म्हणणं न ऐकता पोलिसांनीच केले असल्याचा आरोप नातेवाईकांनी केले. तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर आरोप केले आहेत. हाथरसमधील अत्याचार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात असून आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. हाथरस प्रकरणी SIT कडून चौकशी सुरु केली आहे. एसआयटीनं पीडित परिवाराची भेट घेतली आहे. सात दिवसात एसआयटीला रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पीडित परिवाराची भेट घेणार राहुल आणि प्रियांका गांधी
आज या पीडित परिवाराला राहुल आणि प्रियांका गांधी भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर हाथरस बॉर्डर सील केली आहे. जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आलं आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यास बंदी घातली आहे. राहुल आणि प्रियांका गांधी आज पीडित परिवाराची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत.
दरम्यान मीडियाला पीडितेच्या गावात जाण्यासाठी बंदी घातली आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, मीडियामुळं तपास करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळं त्यांना गावात जाऊ दिलं जात नाही. दरम्यान नोएडा DND फ्लायवेवर देखील सुरक्षा वाढवली आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी 11 वाजता हाथरससाठी निघणार असल्याची माहिती आहे.