राजू शेट्टींच्या नेतृत्वात सांगली-कोल्हापूर ट्रॅक्टर रॅली, वाढीव वीजबिल माफ करण्याची मागणी
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात सांगली जिल्ह्यातून निघालेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ट्रॅक्टर मोर्चा काही वेळात कोल्हापूर शहरात पोहोचेल. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी आपल्या ट्रॅक्टर आणि इतर वाहने घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. केंद्राचे कृषी कायदे जोपर्यंत रद्द होत नाहीत तोपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे. जर यापुढे राजकारण करायचं असेल तर ते शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून करावं लागेल. अन्यथा शेतकरी सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. केंद्रातील विरोधी पक्ष जितक्या ताकदीने उतरायला पाहिजे तितक्यात ताकदीने या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरला नाही. मात्र असं असलं तरी शेतकरी काही केल्या आपल्या मागणीवरून मागे फिरणार नाहीत असे देखील राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
























