Vaccine : पुण्यासाठी केंद्राकडून अडीच लाख नव्हे फक्त 1 लाख डोस,महापौर मुरलीधर मोहोळ यांचा खोटा दावा?
पुणे : कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यात देखील इतर शहरांप्रमाणे लसीचा तुटवडा जाणवतोय. असं असताना पुण्याला केंद्र सरकाकडून थेट दोन लाख 48 हजार डोस पाठवण्यात आल्याचा दावा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. प्रत्यक्षात मात्र पुण्याला देखील राज्यातील इतर शहरांप्रमाणे राज्याच्या कोट्यातूनच लस मिळाल्याचं उघड झालं आहे. दुसरं म्हणजे पुणे जिल्ह्याला शनिवारी फक्त एक लाख डोसचा पुरवठा झालाय त्यापैकी तीस हजार डोस पुणे शहराच्या वाट्याला आलेत. त्यामुळं श्रेय घेण्याच्या नादात पुण्याच्या महापौरांनी केलेले दावे फोल ठरल्याचं उघड झालं आहे. नंतर सारवासारव करताना महापौरांनी 'येत्या तीन दिवसांमध्ये पुण्याला साडे तीन लाख डोस मिळणार असल्याचं आपल्याला म्हणायचं होतं' असं म्हणत वेळ मारुन नेली आहे.























