Raj Thackeray - Uddhav Thackeray Highlights : ब्रँड ठाकरे, ग्रँड मेळाव्याचे हायलाईट्स
Raj Thackeray - Uddhav Thackeray Highlights : ब्रँड ठाकरे, ग्रँड मेळाव्याचे हायलाईट्स
मुंबई : राजधानी मुंबईसह महाराष्ट्रातील मराठी (Marathi) माणसांसाठी आणि शिवसेना-मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत भावूक आणि अभिमान वाटावा असा आजचा क्षण होता. मुंबईतील (Mumbai) वरळी डोम येथे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंचा विजयी जल्लोष सोहळा ग्रँड झाला. ठाकरे ब्रँडचा ग्रँड सोहळा पाहून अनेकांना दिवंगत बाळासाहेबांची आठवण झाली. तर, मनसेच्या स्थापनेअगोदर शिवसैनिक असलेल्या मनसेच्या नेत्यांनी देखील आजच्या क्षणावर भावुक होत प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंचे खास आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर, शिवसेना आमदार अनिल परब (Anil parab), सुधीर साळवी आणि किशोरी पेडणेकर यांचे डोळे पाणावले होते.
आजचा हा क्षण ऐतिहासिक आणि सुवर्णक्षण आहे. मराठी माणसाठी भावुक क्षण आहे, हा भावुक क्षण आणि सण आहे. मराठी माणसाची एकजुट यापुढे कायम राहिल, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि आमदार अनिल परब यांनी दिली. यावेळी, ते भावुक झाल्याचे पाहायला मिळालं. ज्या महाराष्ट्रात माझा जन्म, त्या मराठी भाषेचा सन्मान माझ्यासाठी प्राथमिक राहिल. मी लहानपणापासून शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. ज्यांना बाळासाहेबांनी एकत्र केलं, ज्या पठडीत आम्हाला तयार केलं, त्यांच्यासाठी हा क्षण महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया परब यांनी दिली. विशेष म्हणजे, मुंबईतील ह्या सोहळ्यात ठाकरे बंधूंना एकत्र पाहून अनिल परब यांच्यासह मनसेचे बाळा नांदगावकर, शिवसेनेचे सुधीर साळवी ह्यांनाही अश्रू अनावर झाले होते. बाळासाहेबांची आठवण काढत अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

















