(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Loksabha Result : नाशिकमध्ये तिरंगी लढत, फटका कुणाला बसणार? राजकीय विश्लेषकांचं मत काय?
Nashik Lok Sabha Election Voting : नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje), महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे (hemant Godse) आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांच्यात प्रमुख लढत होत आहे. आज नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची धामधूम सुरु असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत 51.16 टक्के मतदान पार पडले आहे.
सिन्नरमध्ये सर्वाधिक मतदान
सकाळी 7 वाजेपासून मतदानाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. सायंकाळी पाच वाजेपर्यंतची विधानसभानिहाय मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. नाशिककरांनी सकाळच्या सुमारास मोठ्या उत्साहात मतदानाला हजेरी लावली. मात्र दुपारच्या सुमारास नाशिकमध्ये मतदान थंडावल्याचे चित्र आहे. आतापर्यंत सिन्नरमध्ये सर्वाधिक मतदान नोंदवले गेले आहे. तर नाशिकमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे.
विधानसभानिहाय आकडेवारी पुढीप्रमाणे
नाशिक लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 51.16 टक्के इतके मतदान झाले आहेत. त्यामध्ये नाशिक मध्य मतदारसंघात 51.01 टक्के, देवळाली मतदारसंघात 48.80 टक्के, नाशिक पश्चिममध्ये 45.08 टक्के, नाशिक पूर्वमध्ये 49.23 टक्के इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये 57.11 टक्के आणि सिन्नर मतदारसंघांमध्ये 58.70 टक्के मतदान झाले आहे.
शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल
दरम्यान, नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वरच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रवर मतदान केले. मतदान केल्यानंतर शांतिगिरी महाराजांनी आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम मशीनला घातला.यामुळे शांतीगिरी महाराजांवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपच्या आजी-माजी आमदारांमध्ये बाचाबाची
जुने नाशिक परिसरातील मतदान केंद्रावर माजी आमदार वसंत गीते आणि भाजपच्या सत्ताधारी आमदार देवयानी फरांदे यांच्यात बाचाबाची झाली. भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. ठाकरे गटाकडून पैसे वाटप सुरु असल्याचा आरोप भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी केला. तर मतदारांमध्ये उत्साह असल्यामुळे भाजपकडून बिनबुडाचे आरोप करत असल्याचा पलटवार माजी महापौर विनायक पांडे यांनी केला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
राजाभाऊ वाजे यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांच्या घोषणा
राजाभाऊ वाजे यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. मोदींच्या आणि जय श्रीरामच्या घोषणा देत वाजे आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर आल्याचे दिसून आले. तसेच हेमंत गोडसे यांच् नावाच्या देखील घोषणा यावेळी देण्यात आल्या. राजभाऊ वाजे मतदारसंघात आढावा घेत असताना ही घटना घडली आहे.