Girna River Rescue : गिरणा नदीत अडकलेल्या तरूणांचं बचावकार्य
Girna River Rescue : गिरणा नदीत अडकलेल्या तरूणांचं बचावकार्य
गिरणा नदी (Girna River) पात्रात रविवारी मासेमारी करण्यासाठी गेलेले 15 तरुण पाणी पातळी वाढल्याने अडकून पडले होते. रविवारपासून त्यांच्या बचावासाठी रेस्क्यू ऑपरेशन (Girna River Rescue) सुरु होते. अखेर तब्बल 15 तासांनंतर तरुणांची लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या (Helicopter) माध्यमातून सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर तरुणांनी संपूर्ण घटनेचा थरार एबीपी माझाशी बोलताना सांगितला आहे.
नाशिकच्या मालेगावातील सवंदगाव शिवारातील गिरणा नदीपात्रात अडकलेल्या १५ मासेमारांना रेस्क्यू करण्यात प्रशासनाला यश आले आहे. लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करत तीन फेऱ्यांमध्ये नदीपात्रात अडकलेल्या 15 मासेमारांना यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले.
सुटका झाल्यानंतर काय म्हणाले तरुण?
यावेळी तरुण म्हणाले की, रात्री पाऊस नव्हता मात्र अचानक पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे आम्ही रात्रभर तिथे बसून होतो. पाणी वाढत असल्याने थोडी भीती वाटत होती. आम्ही मासेमारी करायला गेलो असता दहा मिनिटात पाणी वाढायला सुरुवात झाली. त्यामुळे आम्ही त्या खडकावर अडकून पडलो. आम्ही या परिसरात दररोज येत नाही. आम्ही महिन्यातून एक ते दोन वेळेस या ठिकाणी मासेमारीसाठी येतो, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, पाणी पातळी जास्त असल्याने रेस्क्यू करण्यात अडचणी येत होत्या. काल प्रयत्न करण्यात आले. मात्र, अंधारामुळे रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आले होते. आज सकाळपासून रेस्क्यू ऑपरेशन राबवून तरुणांची सुखरूप सुटका करण्यात आली. रेस्क्यू ऑपरेशन झाल्यानंतर प्रशासनाकडून तरुणांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.