Mumbai Traffic Police : भाडं नाकारणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई, कडक कारवाईचा इशारा
दूरच्या भाड्यासाठी नजिकचं भाडं नाकारणाऱ्या मुजोर टॅक्सी आणि रिक्षाचालकांना आता मुंबई वाहतूक पोलिसांकडून चाप लावण्यात येणार आहे. टॅक्सी आणि रिक्षा चालकांकडून नजिकचं भाडं नाकारलं जाण्याच्या घटना तुम्हाआम्हा मुंबईत सर्रास पाहायला मिळतात. रात्री बेरात्री तर नागरिकांना या गोष्टींचा हमखास अनुभव येतो. या प्रकारांना आता आळा बसणार असून, भाडं नाकारणाऱ्या मुजोर टॅक्सी आणि रिक्षा चालकांविरोधात कारवाई करण्याचे अधिकार प्रभारी पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांच्या मासिक आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात रेल्वे आणि बसस्थानकाबाहेर दर्शनी भागात फलक लावण्यात आले आहेत. तसंच मोटार वाहन कायद्यातील कलम १७८ मधील उपकलम तीन अन्वये मुजोर टॅक्सी आणि रिक्षाचालकांविरोधात कारवाई करण्यात येईल.























