(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palghar : 500 रुपये उसने घेतल्याने मालकाकडून पिळवणूक, त्रासाला कंटाळून आत्महत्या, कुटुंबाचा आरोप
पालघर : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देखील आदिवासी कातकरी शेत मजुराचा वेठबिगारीच्या पाशात अडकून बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा या दुर्गम तालुक्यात एका मजुराला त्याच्या मुलाच्या कफनासाठी वेठबिगारी करण्याची वेळ ओढवली. काळू पवार (48) असे या दुर्दैवी कातकरी शेत मजुराचे नाव आहे.
माहितीनुसार त्याने मुलाच्या अंत्यसंस्कारला कफन घेण्यासाठी रामदास कोरडे या मालकाकडून 500 रुपये उसने घेतले होते. ते पैसे फेडण्यासाठी रामदास कोरडेने काळूला गडी म्हणून राबवून पिळवणूक करत असल्यानेच कंटाळून अखेर त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप त्याची पत्नी सावित्री पवार हिने आपल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी मालक रामदास अंबु कोरडे याच्या विरोधात मोखाडा पोलिस ठाण्यात "बंधबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम १९७६" अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.