Mumbai Weather | पुढील 3-4 तास मुंबईत मध्यम स्वरुपाचा पाऊस; हवामान खात्याचा इशारा
ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे. थंडीच्या मोसमात स्वेटर घालण्याऐवजी आता चक्क छत्री आणि रेनकोट घेऊन घराबाहेर पडावं लागत आहे. मुंबई आणि लगतच्या उपनगरांत पावसानं दमदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मध्यरात्रीपासून तर काही ठिकाणी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच मराठवाडा, कोकणातील अनेक भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत.
अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं ढगाळ हवामान होतं. त्यानंतर अनेक भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळायला सुरुवात झाली होती. अशातच वातावरणातील बदलांमुळे मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईतील हवामान रविवारीही ढगाळ नोंदविण्यात आलं. विशेषत: सकाळसह दुपारी मुंबईत बहुतांश ठिकाणी तुरळक सरींनी हजेरी लावली. विशेषत: येथील ढगाळ हवामान आणखी दोन दिवस कायम राहणार असून, 14 आणि 15 डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.