'मराठी'साठी लढा | खासदार अरविंद सावंत यांनी घेतली लेखिका शोभा देशपांडेंची भेट
मराठीचा आग्रह धरल्याने सराफाने अपमानास्पद वागणूक दिल्याने मुंबईतील कुलाब्यात लेखिका शोभा देशपांडे यांनी जवळपास 20 तास ठिय्या दिला. एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर शोभा देशपांडे यांच्या आंदोलनाची दखल घेतली. अखेर या मुजोर सराफाने शोभा देशपांडे यांची माफी मागितली. मला मराठी बोलता येतं, माझा जन्म मुंबईत झाला आहे, मला माफ करा, असं सांगत महावीर ज्वेलर्सचा मालक शंकरलाल जैन याने शोभा देशपांडे यांची माफी मागितली.
कालपासून ठिय्या सुरु केलेल्या शोभा देशपांडे रात्रभर फूटपाथवरच होत्या. सकाळी संदीप देशपांडे या ठिकाणी पोहोचून त्यांची विचारपूस केली. त्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलीस एका गाडीतून ज्वेलरला घेऊन घटनासाठीस्थळी आले. यानंतर इथे एकच गोंधळ आला. आधीच उपस्थित असलेले मनसे सैनिक अतिशय आक्रमक झाले. मला मराठी बोलता येतं, माझा जन्म मुंबईत झाला आहे. मला माफ करा, असं या सराफा व्यावसायिक म्हणाला. मात्र शोभा देशपांडे यांचे पाय धरुन माफी मागा, असा आग्रह मनसे कार्यकर्त्यांनी केला. माफी मागितल्यानंतर पोलीस महावीर ज्वेलर्सच्या मालकाला घेऊन जात असताना, मनसे कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच प्रसाद दिला.