CSMT स्थानकाचा गौरव; महाराष्ट्रातील पहिले हरित रेल्वे स्थानक
मुंबई : मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला महाराष्ट्रातील पहिले हरित रेल्वे स्थानक झाल्याने इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलकडून सुवर्ण प्रमाणपत्र देण्यात आले आहे. असे प्रमाणपत्र मिळवणारे ते महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्थानक आहे. मंगळवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी आपल्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या पथकासह आयजीबीसीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गुरमितसिंग अरोरा यांच्याकडून आयजीबीसीचे प्रमाणपत्र स्वीकारले.
मध्य रेल्वेने आपल्या सीएसएमटी स्थानकात विविध हरित उपक्रम राबविले आहेत. ज्यात वृक्षारोपणाद्वारे हरित क्षेत्रे तयार करणे, सौर पॅनेल बसविणे, अनेक स्थानकांवर ग्राहक अनुकूल उपक्रम राबविणे, एलईडी बल्ब आणि दिवे लावणे अश्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. इतकेच नाही तर संपूर्ण स्थानकामध्ये नवीन प्रकारचे सूचना फलक लावण्यात आले आहेत. या सूचना फलकांमुळे सीएसएमटी स्थानकाचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. नागरिकांना त्यांच्यासाठी असलेल्या सुविधा शोधत फिरावे लागत नाहीत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे सूचना फलक आता लावण्यात आल्याने प्रवाशांना त्याचा फायदा होत आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.