Colour Code : मुंबईत खासगी वाहनांसाठी 'कलर कोड सिस्टम', मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची माहिती
संचारबंदीच्या काळातही विनाकारण घराबाहेर पडून आणि रस्त्यावर वाहतूक कोंडी करणाऱ्या मुंबईकरांवर आता पोलिस कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. उद्यापासून मुंबईत खासगी वाहनांसाठी कलरकोड सिस्टम लागू होणार आहे. मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह माहिती दिली. कलर कोड सिस्टमनुसार वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या गाड्यांसाठी लाल रंगाचं वर्तुळ लावणं बंधनकारक असेल.
भाजीपाल्याच्या गाड्यांसाठी हिरव्या रंगाचं तर इतर अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी पिवळ्या रंगाचं वर्तुळ असणं अनिवार्य करण्यात आलंय. मुंबईत होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी हा खबरदारीचा उपाय अंमलात आणण्याचं ठरवलंय. दरम्यान, कलरकोडचा गैरवापर केल्यास ४१९ कलमाखाली गुन्हा दाखल करणार असल्याची एक्स्क्लुझिव्ह माहिती मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळेंनी एबीपी माझाला दिली आहे.























