(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WEB EXCLUSIVE : Cyclone : जाणून घ्या कशी ठरवली जातात वादळांची नावं
पूर्वी चक्रीवादळांना नावं दिली जात नव्हती. वादळांच्या तारखांवरूनच ती लक्षात ठेवली जात होती, पण यामध्ये अनेक अडचणी जाणवू लागल्या. त्यातच समुद्रात एकाच वेळी दोन किंवा त्याहून अधिक भागांत चक्रिवादळसदृश परिस्थिती उदभवण्याची शक्यताही नाकारली गेली नाही. अशा परिस्थितीत तारखांचं गणित काहीसं कठिणच होत गेलं. ज्यानंतर जागतिक स्तरावर वैज्ञानिकांनी चक्रीवादळांना नावं देण्याचं ठरवलं, असं हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर एबीपी माझाशी संवाद साधताना म्हणाले.
चक्रीवादळाच्या नावांवरुन बरेच विचार झाले, ज्यानंतर बाहेरील देशांमध्ये वादळांना महिलांची नावं देण्यात आली. पण, वादळाचा थेट संदर्भ हा विध्वंसाशी लावला जात असून, यामध्ये नकारात्मकताच जास्त येते म्हणून यावर आक्षेप घेतला गेला आणि मग चक्रीवादळांना दुसऱ्या नावानं संबोधण्यास सुरुवात झाली.
होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार चक्रीवादळाच्या नावांसाठी दक्षिण आशियायी राष्ट्रांचा एक गट तयार करण्यात आला आहे. इथं देशांकडून वादळांच्या नावांचे पर्याय मागवण्यात येतात, या नावांची एक यादी तयार केली जाते. सध्याच्या घडीला तयार असणारी नावांची यादी ही इतकी मोठी आहे की, चक्रीवादळं कमी आल्यास 3 वर्षे ही नावं पुरेशी असतील.
चक्रिवादळांची नावं निर्धारित करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्व पाळली जाणं महत्त्वाचं असतं. यामध्ये कोणत्याही संवेदनशील नावांची निवड केली जात नाही. लिंगभेदी आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱी नावंही टाळली जातात. याशिवाय राजकीय नेते, ऐतिहासिक व्यक्ती यांची नावंही वादळांना देण्यात येत नाहीत.
काही दिवसांपूर्वी हवामान खात्यानं जनसामान्यांनाही चक्रीवादळासाठी नावं सुचवण्याचं आवाहन केलं होतं. भारतातर्फे नागरिकांनी सुचवलेल्या या नावांवर एक समिती काम करते आणि मग चक्रिवादळांची नावं निर्धारित केली जातात. सध्याच्या घडीला दक्षिण आशियायी देशांच्या यादीत असणाऱ्या देशाच्या क्रमाप्रमाणे ही नावं दिली जातात. आगामी काळात येणाऱ्या चक्रीवादळाचं नाव हे आधीच ठरलेलं असतं, असं सांगत नॉर्थ इंडियन ओशन म्हणजेच बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंद महासागर या भागात येणाऱ्या चक्रीवादळांची नावं आधीच ठरलेली आहेत हे के.एस. होसाळीकर यांनी स्पष्ट केलं.