ई-पीक पाहणीच्या अंमलबजावणीकरिता शेतकऱ्यांवर सक्ती करू नये ; बच्चू कडू यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अमरावती : ई-पीक पाहणीच्या अंमलबजावणीकरिता शेतकऱ्यांवर सक्ती करू नये, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रातून केली आहे. यावेळी एबीपी माझाला बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ई पीक पाहणी केली नाही तर नुकसान भरपाई मिळणार नाही हा कुठला न्याय आहे. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांना भेटणार असल्याचंही राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.
राज्यात सद्यस्थितीत राबविण्यात येत असलेल्या ई-पीक पाहणी कार्यक्रमा अंतर्गत यासाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये शेतकरी बांधवांकडून स्वतः आपले शेतजमीन आणि पिकांची माहिती भरून घेण्यात येत आहे. परंतु, राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, अँड्रॉईड फोन, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, पुरेश्या ज्ञानाचा अभाव इत्यादी अनेक अडचणी असल्यामुळे शेतकरी बांधवांकडून माहिती भरून घेण्याची सक्ती न करता पूर्वीप्रमाणेच शासकीय यंत्रणांकडून हा कार्यक्रम राबविण्यात यावा, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे. यावेळी बच्चू कडू म्हणाले की, ई पिकसाठी प्रत्येक तहसीलला ड्रोन कॅमेरा द्या आणि त्यांच्या मार्फत पाहणी करा.