Vishnu Ganesh Pingle: जीवनपट विष्णू गणेश पिंगळेंचा, ज्यांनी देशासाठी अर्पण केलं सर्वस्व ABP Majha
‘यज्ञी ज्यांनी देऊन निजशीर, घडिले मानवतेचे मंदिर! परि जयांच्या दहनभूमीवर, नाही चिरा नाही पणती। तिथे कर माझे जुळती ’ या पंक्तीला पात्र ठरलेले असंख्य वीर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या देहाच्या समिधा अर्पण करून गेले. अशा अनाम स्वातंत्र्यवीरांपैकी एक विष्णू गणेश पिंगळे. आज त्यांचा स्मृतिदिन. पुणे जिल्ह्यातील शिरूर गावी जन्मलेला हा युवक यंत्रविशारद पदाचा अभ्यासक्रम पूर्ण करून अमेरिकेत गेला आणि लाल हरदयाळांच्या गदर पार्टीत सहभागी झाला. बॉम्ब तयार करून एकाच वेळी अनेक ब्रिटिश लष्करी छावण्या उद्ध्वस्त करण्याची योजना लाल हरदयाळांनी आखली, ती अशाच तळहातावर शिर घेऊन झुंजणा-या सहका-यांच्या बळावर! गदर पार्टीने ही योजना आखली. मनसुबे रचले गेले. पण फितुरीने घात केला. ही योजना लाला हरदयाळ आणि विष्णू गणेशसारखे त्यांचे सहकारी राबवू शकले नाहीत. पिंगळेंना अटक झाली. त्यांच्यासह सात क्रांतिकारकांना दि. १६ नोव्हेंबर १९१५ रोजी फाशी देण्यात आले.