(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Exit Poll : एक्झिट पोल्समध्ये पुन्हा मोदी सरकारचा अंदाज, शेअर बाजार उघडताच मोठी उसळी
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर आला आहे. याच निकालाचा परिणाम सध्या शेअर बाजारावर दिसतो. देशात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचाच साकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसतोय. आज आठवड्याचा पहिल्याच दिवस आहे. या दिवशी शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम आज सकाळच्या प्री-ओपनिंग मार्केटमध्येच दिसून आला. प्री-ओपनिंग मार्केट सेशनमध्ये मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) यांच्यात मोठी उसळी पाहायला मिळाले.
प्री-ओपनिंग सेशनमध्ये मार्केटची काय स्थिती?
सध्या शेअर बाजाराचे निफ्टी आणि सेन्सेक्स हे प्रमुख निर्देशांक चांगल्या स्थितीत दिसत आहेत. त्याची प्रचिती आज सकाळच्या मार्केट प्री-ओपिंग सेशनमध्येच दिसून आली. लोकसभा निकालापुर्वी शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायाला मिळाले आहे. प्री ओपनिंगमध्ये सेन्सेक्सने 3051 अंकांची तर निफ्टीनेही 870 अंकांनी उसळी घेतली.
शेअर बाजार चालू होताच सेन्सेक्समध्ये 2000 अंकांची उसळी
प्री-ओपनिंग सेशनमध्ये दोन्ही निर्देशांकांनी मोठी उसळी घेतली. त्यामुळे शेअर बाजार चालू झाल्यामुळेदेखील सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगलीत तेजी पाहायला मिळाली. पहिल्या काही मिनिटांमध्ये सेन्सेक्स थेट 2200 पर्यंत उसळला. तर बाजार चालू होताच निफ्टीदेखील थेट 23,337.9 अंकापर्यंत वधारला. सेन्सेक्सने 76,738.89 अंकांचा ऐतिहासिक स्तर गाठल्याचे पाहायला मिळाले. सध्या हे दोन्ही निर्देशांक तेजीत आहेत. त्यामुळे सत्राच्या पहिल्या काही मिनिटांतच गुंतवणूकदारांनी चांगली कमाई केली आहे.