Sharad Pawar Family : 3 खासदार, 1 आमदार, 1 उपमुख्यमंत्री! पवारांच्या घरी किती पदं? ABP Majha
Sharad Pawar & Ajit Pawar NCP : राष्ट्रवादी अजित पवार गटातून रिक्त झालेल्या राज्यसभेची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मात्र, या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनाच राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. विरोधात कोणताही उमेदवार न आल्याने सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये अवघ्या काही दिवसांपूर्वीच पराभवाला सामोरे गेल्यानंतरही सुनेत्रा पवार यांची मागच्या दाराने संसदेमध्ये एन्ट्री झाली आहे. त्यामुळे त्यांच्या रूपाने बारामतीला तिसरा खासदार मिळाला आहे. लोकसभेला सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभेला मोठा पराभव करत खासदारकीची हॅट्रिक केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा राज्यसभेवर खासदार आहेत.
दोन्ही गटांमधून पवार फॅमिलीचाच बोलबाला
एकट्या बारामतीमधून आता तीन खासदार झाले आहेत. त्यामुळे संसदेमध्ये बारामतीची ताकद चांगलीच निर्माण झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच बारामतीचे वर्चस्व राज्याच्या राजकारणात राहिलं आहे. नेहमीच बारामती चर्चाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून ते पार दिल्लीपर्यंत सातत्याने होत असते. आता राष्ट्रवादीचे दोन शकले झाली आहेत. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात राष्ट्रवादीमध्ये दोन तुकडे झाले आहेत. मात्र, या दोन्ही गटांमधून पवार फॅमिलीचाच बोलबाला आहे. बारामतीमधून तीन खासदार आणि दोन आमदार सुद्धा याच पवार कुटुंबातून आहेत.
आणखी एक पवार राजकारणात एन्ट्री करण्यास सज्ज
अजित पवार स्वतः बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे पुतणे रोहित पवार कर्जत विधानसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे एकाचवेळी बारामती पवार कुटुंबातून तीन खासदार आणि दोन आमदार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी फुटल्यानंतर पवार कुटुंबांमध्ये संघर्ष सुरू आहे. या संघर्षामध्ये अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी सुद्धा उडी मारली आहे. पण त्यांच्याकडेही बारामती सुद्धा कुस्ती संघटनेचे पद आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीला त्यांनाच उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी युगेंद्र पवारांच्या समर्थकांनी शरद पवारांकडे केली आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवार विरुद्ध युंगेंद्र पवार सामना होणार असल्याची चर्चा आतापासून रंगली आहे.
त्यामुळे आणखी एक पवार राजकारणात एन्ट्री करण्यास सज्ज आहेत. सुप्रिया सुळे राष्टवादीच्या स्थापनेनंतर बराच कालावधी लागला होता. मात्र, अजित पवार यांनी अवघ्या सात महिन्यांमध्ये सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर सुनेत्रा पवार आता राज्यसभेत दिसतील.