Maharashtra Congress President |काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब
नवी दिल्ली : महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडने अंतिम शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून काँग्रेसमध्ये ही अंतर्गत बदलाची प्रक्रिया सुरु होती. त्यात नाना पटोले यांचं नाव निश्चित झाल्याने आता महाराष्ट्रात विधानसभेचा नवा अध्यक्ष देखील बदलावा लागणार हे उघड आहे. नाना पटोले यांच्या रुपाने काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष हा विदर्भातून असेल. पुढच्या दोन ते तीन दिवसात कधीही नाना पटोले यांच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.
प्रदेशाध्यक्षपदासाठी राजीव सातव, विजय वडेट्टीवार यांचीही नावे चर्चेत होती. मात्र काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी यांच्या पुनरागमनाची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राजीव सातव यांना दिल्लीतून सोडण्यास हायकमांडने नकार दिला आहे. विजय वडेट्टीवार यांच्याबाबतही काँग्रेसमधला एक वरिष्ठ नेत्याचा गट सक्रिय होता. मात्र या दोघांऐवजी नाना पटोले यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
नाना पटोले यांच्या निवडीमुळे विधानसभा अध्यक्ष बदलाचा ही प्रश्न आहे. त्याबाबत काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतही चर्चा केल्याचं समजत आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून कोणाची निवड होणार याची ही चर्चा सुरु होईल.