(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Congress President | काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत नाना पटोले आघाडीवर, पण अंतिम निर्णय राहुल गांधी परतल्यावरच
Maharashtra Congress President : महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरु आहे. आता या पदासाठी नाना पटोले यांचं नाव आघाडीवर आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत नाना पटोले यांचं नाव सध्या आघाडीवर आहे, पण बदलाबाबतचा अंतिम निर्णय राहुल गांधी मायदेशी परतल्यावरच होणार आहे. दोन दिवस मुंबईत मंत्री, आमदारांसोबत मंथन करुन दिल्लीत पोहोचलेले महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील हे दिल्लीत कुठल्याही महत्त्वाच्या बैठकीविनाच आज सकाळी कर्नाटकमध्ये परतले आहेत. दिल्लीत संघटन महासचिव के सी वेणुगोपाल यांच्यासोबत त्यांची बैठक अपेक्षित होती, ती बैठक न होताच एच के पाटील हे कर्नाटकला परतले. एच के पाटील यांची प्रकृती काहीशी ठीक नसल्याचंही सांगितलं जात होतं.
प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत सध्या नाना पटोले यांचं नाव आघाडीवर आहे. काल राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करताना नाना पटोले कसे राहतील अशी विचारणा प्रभारी एच के पाटील करत होते. त्यामुळे नाना पटोले यांच्या नावाला हायकमांडचा ग्रीन सिग्नल मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. काँग्रेस खासदार आणि सध्या गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांचंही नाव शर्यतीत आहे. त्यामुळे बिगरमराठा चेहरा देण्याबाबत काँग्रेसचा निर्णय अंतिम राहतो की ऐनवेळी आणखी कुठलं नाव समोर येतं याचीही उत्सुकता असेल.
दरम्यान दोन दिवस मुंबईत तातडीच्या बैठका खलबतं झाल्यानंतर दिल्लीत मात्र एच के पाटलांच्या बैठका थंडावल्या. काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपद, प्रदेशाध्यक्षपद, महसूलमंत्रीपद या तीनही पदांची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडे असल्याने बदलाची ही प्रक्रिया सुरु झाली होती.
नाना पटोले याचं नाव सध्या शर्यतीत आघाडीवर आहे. नाना पटोले हे सध्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रात सरकार सध्या तीन पक्षांचं आहे, त्यामुळे या बदलाबाबत सत्तेत सहभागी असलेल्या इतर पक्षांचं काय मत राहतं हेही पाहणं महत्त्वाचं असेल.
Maharashtra Congress | राहुल गांधी मायदेशी परतल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय